नवी दिल्ली – सचिन तेंडुलकर याचा सर्वात मोठा चाहता असलेला सुधीर गौतम लॉकडाऊनमुळे राजधानीतच अडकून पडला आहे.
सचिनचा सहभाग असलेला प्रत्येक सामना सुधीरसाठी खास असतो. संपूर्ण शरिरावर विविध रंगांच्या छटा लावून सचिनला चिअर करण्यासाठी सुधीर तिथे उपस्थित असतो. त्याची उपस्थिती प्रेक्षकांसाठीही उत्साह वाढविणारी असते. मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक आपल्या आवडत्या खेळाडूला चिअर करत असतात तेव्हा भारतीय खेळाडू मात्र, सुधीर कुठे दिसत आहे हे पाहात असतात. सुधीरने सचिनला फॉलो करायला सुरूवात केल्यापासून गेल्या दोन दशकात एकही सामना चुकविलेला नाही.
करोनामुळे जर क्रिकेट बंद झाले नसते तर सुधीर चेन्नईत दिसला असता. या दिवशी आयपीएल मधील मुंबई आणि चेन्नई यांच्या सामन्यानंतर त्याने सचिनचा 47 वा वाढदिवस साजरा केला असता. पण आता ही स्पर्धाच स्थगित झाल्याने सुधीरसह सचिनच्या चाहत्यांची निराशा होणार आहे. सुधीर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत अडकला आहे. सुधीर दिल्लीत एका मित्राच्या घरी आहे. लॉकडाऊनमुळे सुधीरला थांबावे लागले आहे.