अमेरिका अव्वल क्रमांकावर तर चीनचा दुसरा क्रमांक
जगभरातील संरक्षण खर्चात 3.6 टक्के वाढ
लंडन : गेल्या वर्षी जगभरात लष्करावरील खर्च सर्वाधिक म्हणजे 3.6 टक्के इतका झाला होता. त्यामध्येही चीन आणि भारताकडून लष्करावर भरमसाठ खर्च झाला असून या खर्चाबाबतच्या क्रमवारीमध्ये या दोन्ही देशांचे क्रमांक अनुक्रमे दुसरा आणि तिसरा लागतो आहे. लष्करावरील खर्चाबाबत अर्थातच अमेरिका आघाडीवर आहे. स्टॉकहोम इथल्या अभ्यासगटाने सोमवारी ही माहिती दिली. शस्त्रास्त्र खरेदीबाबत आशिया खंडातील दोन मोठे देश प्रथमच आघाडीवर असल्याचे या निरीक्षणामुळे समोर आले आहे.
जगभरातील लष्करावरील खर्च 2019 मध्ये 1,917 अब्ज डॉलर इतका प्रचंड वाढला होता. 2018 मध्ये झालेल्या खर्चाच्या तुलनेत हा खर्च 3.6 टक्क्यांनी अधिक होता, असे “स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्युट’ने म्हटले आहे. लष्करी खर्चावरील 3.6 टक्क्यांची वाढ ही 2010 पासूनची सर्वाधिक वाढ असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 2019 मध्ये चीनचा लष्करी खर्च 261 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला. 2018 च्या तुलनेत 5.1 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर भारताच्या खर्चामध्ये 6.8 टक्क्यांनी वाढ झाली आणि हा खर्च 71.1 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे.
जगभरातील एकूण खर्चामध्ये अमेरिका, चीन, भारत, रशिया आणि सौदी अरेबिया या पाच मोठ्या देशांच्या खर्चाचे प्रमाण 62 टक्के इतके आहे. भारत आणि चीन व्यतिरिक्त जपान (47..6 अब्ज डॉलर) आणि दक्षिण कोरिया (43.9 अब्ज डॉलर) हे आशिया खंडातील सर्वात मोठे लष्करी खर्च करणारे देश आहेत. असे या अहवालात म्हटले आहे.