नवी दिल्ली: सध्या देशात करोना चाचणी किट्सच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात नफेखोरी केली जात असून स्वस्तात आयात करण्यात आलेले किट्स मोठा नफा घेऊन वितरीत केले जात आहेत या प्रकरणात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. या संबंधात काही माध्यमांनी दिलेल्या पुराव्यांनुसार प्रत्येक किट्स मागे दीडशे टक्के इतका नफा घेतला जात आहे याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
देशात करोना सारखी भीषण आपत्ती कोसळली असतानाही काही जण यात नफेखोरी करीत आहे ही लाजीरवाणी बाब आहे. अशा नफेखोरांच्या विरोधात मोदींनी कारवाई करण्याचा आदेश दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. अशा नफेखोरांना देश कधीही माफ करणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
या संबंधात कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की, सध्या 225 रूपयांचे किट्स 600 रूपयांना विकले जात आहे. ही बाब अमानवीय आणि लाजीरवाणी आहे. या नफेखोरीला आळा कोण घालणार आणि त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना उद्देशून केला आहे. या नफेखोरीला कोणाचा आर्शीवाद आहे असा सवालही त्यांनी केला आहे.