मेलबर्न – जगभरातील अव्वल फलंदाजांना गोलंदाजी केली. मात्र, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला गोलंदाजी केल्यानंतरच माझ्या गोलंदाजीत खरी सुधारणा झाली, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले आहे.
सचिनसारखे फलंदाज तुमची परीक्षा पाहतात. सचिन जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा तो तुम्हाला कोणतीच संधी देत नाही. तो सातत्याने गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्याच्या विचारात असतो. त्याच्याकडे जगातील कोणत्याही गोलंदाजाचा चेंडू खेळण्यासाठी अन्य फलंदाजांपेक्षा जास्त वेळ असतो. मी त्याला गोलंदाजी करत असताना मला वाटायचे की तो आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नातच बाद होईल.
मात्र, तो माझा भ्रम होता. तो आक्रमक असेल तर त्याला एकेरी, दुहेरी धावा घेऊ द्याव्यात. मात्र, चौकार व षटकार मारण्याची संधी देऊ नये असा विचार करायचो तर त्याच्या उलट व्हायचे. सचिन प्रत्येक चेंडूवर चौकार कसा फटकावता येईल याचा विचार करायचा. त्याच्या याच मानसिकतेचा अभ्यास केल्यावरच मला सचिनसह जगभरातील दिग्गज फलंदाजांना कशी गोलंदाजी करायची याचा धडा मिळाला, असेही ब्रेट ली याने सांगितले.