मेलबर्न – मुंबईतील दीडशतकी खेळी असो, शारजातील वादळी फलंदाजी असो किंवा ऑस्ट्रेलिया व भारतातील फिरकीला साथ देणारी खेळपट्टी असो, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शेन वॉर्नवर या प्रत्येक लढतीत वर्चस्व राखले. ज्या वॉर्नने आपल्या अनाकलनीय फिरकीच्या जाळ्यात दिग्गज फलंदाजांना अडकवले त्यालाही सचिनवर दडपण आणण्यात एकदाही यश आले नाही यातच सचिनचा महानपणा स्पस्ष्ट होतो, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा कसोटीपटू व माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने सचिनचा गौरव केला आहे.
सचिनने वॉर्नच्या गोलंदाजीवर केलेला हल्ला पाहिला तर असे लक्षात येते की, वॉर्न हा आंतरराष्ट्रीय गोलंदाज असूनही सचिन त्याला एखादा क्लब दर्जाचा गोलंदाज असल्याप्रमाणे वागवतो. वॉर्नने आपल्या तालावर जगभरातील अनेक दिग्गज फलंदाजांना नाचवत होता. मात्र, सचिन समोर असताना त्याची मात्रा कधीही चालली नाही. त्याची चेंडूला फिरकी देण्याची क्षमता वादातीत होती. मात्र, सचिनकडे त्याच्या प्रत्येक चेंडूवर कसा फटका मारायचा याबाबत तिन पर्याय असायचे. अन्य फलंदाज शक्यतो गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा टप्पा पाहून फलंदाजी करायचे व तिथेच फसायचे. सचिन मात्र वॉर्नच्याच नव्हे तर प्रत्येक गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटल्यानंतर पुढच्याच क्षणी त्याला अंदाज यायचा की चेंडू कसा असेल. इथेच सचिनची महानता स्पष्ट होते, असेही ली याने नमूद केले.
ऑस्ट्रेलियाच्या संघात वॉर्न असताना झालेल्या 12 कसोटी सामन्यात सचिनने 60 पेक्षा जास्त सरासरी नोंदवली आहे. त्यात सचिनने 5 शतके तर, तीतकीच अर्धशतके फटकावून 998 धावा केल्या आहेत. सचिन फलंदाजीला आला की चाहते वॉर्नविरुद्ध सचिन कसा खेळतो यासाठी मैदानांवर गर्दी करायचे.