तळेगाव हॉस्पिटलमध्ये दहा व्हेंटिलेटर धूळखात

तळेगाव दाभाडे – येथील तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये 26 व्हेंटिलेटरपैकी 10 व्हेंटिलेटर धूळ खात पडले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आतापर्यंत उपलब्ध केलेल्या 26 व्हेंटिलेटरची तपासणी केली असता, मागील दीड महिन्यापासून 10 व्हेंटिलेटर धूळ खात पडले असल्याने हॉस्पिटलच्या प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली.

मावळ तालुक्‍यात 4107 करोना रुग्णसंख्या झाली असून बुधवार (दि.23) पर्यंत 136 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांना व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी सर्कस करावी लागत आहे. काहींना वेळेत व्हेंटिलेटर मिळाले नसल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने 6 व्हेंटिलेटर दिले त्यापैकी 1 व्हेंटिलेटर वापरले गेले नाही. सिव्हील सर्जन (सीएस) चे 4 ही व्हेंटिलेटरचा वापर केला जात नाही.

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सने 7 व्हेंटिलेटर दिले त्यापैकी 5 व्हेंटिलेटर वापरले नाहीत. रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने वारंवार सांगण्यात येते होते. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या तळेगाव जनरल हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली. सध्या मावळ तालुक्‍यात 100 रुग्णांसाठी बेड उपलब्ध आहेत. ज्यांना बेड मिळत नाही त्यांनी आमदार कार्यालयात, तहसीलदार मधुसूदन बर्गे व कोविड-19 समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांच्याशी संपर्क करावा, असे सांगण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे म्हणाले, मावळ तालुक्‍यात करोना रुग्णांना व्हेंटिलेटर त्वरित उपलब्ध होण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून तळेगाव जनरल हॉस्पिटलला देण्यात आलेल्या 10 व्हेंटिलेटरचा वापर केला नाही. रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयांचा आश्रय घ्यावा लागला. या रुग्णालयावर व्हेंटिलेटर का वापरले नाही याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.