देहूरोडमधील तीन पोलीस अधिकाऱ्यांसह दहा कर्मचाऱ्यांना “टेन्शन’

  • करोना चाचणी “पॉझिटिव्ह’ आलेल्या तडीपार गुंडाच्या आले संपर्कात

देहूरोड – तडीपाराच्या आदेशाचे भंग करीत देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरणाऱ्या तडीपाराला अटक केले; मात्र तो करोना बाधित असल्याने अटक केल्यानंतर त्याच्या सानिध्यात आलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे नऊ ते दहा पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. तर येथील कोविड केअर सेंटरमध्ये पोलीस बंदोबस्तात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दोन वर्षांकरीता तडीपार असलेला निखील ऊर्फ लखन बाळू आगळे (वय 21, रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड, ता. हवेली) हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त, परिमंडळ 2 चे उपायुक्‍त यांचे अथवा कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग करीत हद्दीत फिरताना देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सचिन श्रीमंत शेजाळ यांनी त्याला रविवारी (दि. 25) रात्री सव्वा दहाच्या सुमारास एम. बी. कॅम्पयेथे पकडले होते.

पोलिसाचे कॉलर पकडून धक्काबुक्की करून, शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले होते.न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आगळे यावर गंभीर स्वरूपाचे देहूरोड पोलीस ठाण्यांमध्ये तीन गुन्हे दाखल होते.

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवडे आणि या प्रकरणी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण तसेच दोन दिवस पोलीस कोठडीत असताना बंदोबस्तात असणारे पोलीस कर्मचारी तसेच त्यानंतर इतर आरोपींबरोबर आगळे याला कारागृहात घेऊन जाताना असणारे पोलीस कर्मचारी सचिन शेजाळ, किशोर बोंडे, हेमंत गायकवाड, केदार बिडवे यास त्याच्या सानिध्यात काही कर्मचारी आले होते. आगळे याला कारागृहात रवाना करण्यापूर्वी मंगळवारी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर बुधवारी आगळे याचा करोना बाधीत अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.

या संदर्भात पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोंडे यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेला दुजोरा दिला. अधिक माहिती देताना ते म्हणाले आगळे याला कारागृहात रवाना करताना त्याचा करोना बाधित अहवालामुळे कारागृहाने ताब्यात (स्वीकृत) न घेतल्यामुळे त्याला देहूरोड कोविड केअर सेंटर येथे पोलीस बंदोबस्तमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. कोविंड सेंटर येथे तिघा पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

कारागृह स्वीकृत करत नाही. त्यावर काय कारवाई करावी. यासंदर्भात त्याचा अहवालही न्यायालयासाठी पोलिसांनी पाठवला असल्याचे तर सर्व पोलिसांचे कोविड लसीकरण झाले असून, त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचे अँटिजेन तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती ही त्यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.