Tejashwi Yadav । बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या जनविश्वास यात्रेदरम्यान सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एस्कॉर्ट वाहनाची कारला धडक बसली. या अपघातात एस्कॉर्ट वाहनाच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा पोलिसांसह नऊ जण जखमी झाले.
सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहम्मद हलीम आलम असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ड्रायव्हर, होमगार्ड जवानाचे नाव असून तो मधुबनी येथील रहिवासी होता.
कार आणि एस्कॉर्ट वाहन यांच्यात झालेल्या धडकेने बीएमपीचे सहा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे तिघेही जखमी झाले आहेत.
अपघातानंतर कारच्या एअरबॅग उघडल्यामुळे कारमधील प्रवाशांना फारशी दुखापत झाली नसून ते धोक्याबाहेर आहेत. सर्वांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.