निराश्रित अश्रू

“माणसाने वर्तमानात जगायला शिकले पाहिजे, भूतकाळाचा विचार करू नये. जे घडून गेलं त्याचा विचार करण्यात काय अर्थ आहे? “झालं गेलं गंगेला मिळालं.’ असं कितीही टाहो फोडून सांगितलं तरी माणूस भूतकाळातील आठवणीत रमतोच. त्यातील काही आठवणी अशा असतात की त्यांनी मनावर कायमचा ओरखडा उमटवलेला असतो. अशा आठवणी नको म्हटले तरी अधूनमधून वर डोके काढतातच. कारण त्या आठवणींनी मनावर घाव घातलेला असतो.

आता हेच पाहा ना, नानासाहेबांना त्यांच्या जावयाने पत्र पाठवले होते. त्यात लिहीलं होतं- “मी माणसं ओळखत नाही; तर पैसे ओळखतो.’ ही गोष्ट आहे 1956 सालातली. तेव्हा नानासाहेब पवारांच्या थोरल्या मुलीचं कुंदाचं लग्न नरसिंह कदम यांच्याशी झालं होतं. नरसिंह कदम पोलीस खात्यात नोकरीला होते. मुलगा सरकारी नोकरीत आहे म्हणून नानासाहेबांनी उचल खाल्ली. स्थळ पसंत पडलं, दोन्ही बाजूंना सर्व गोष्टी मान्य झाल्या. हुंडा ठरला शंभर रुपये. नानासाहेबांनी लग्न व्यवस्थित करून दिलं. ज्याचा त्याचा मानपान ज्याला त्याला यथायोग्य दिला. हुंड्याच्या रकमेपैकी ऐंशी रुपये दिले. उर्वरित वीस रुपये देणे जमले नाही. कारण नानासाहेब शेतकरी होते. कुंदाच्या पाठीवर पाच मुलं होती. या सर्वांचं करता करता नानासाहेब मेटाकुटीला आले होते. पैसे मागे पडणे अवघड होते. त्यामुळे हुंड्याच्या रकमेची पूर्तता करणे त्यांना जमले नाही.

मात्र, लग्नात जावई रुसून बसला. “हुंड्याची राहिलेली रक्कम द्या, नाहीतर मी लग्नाला उभा राहणार नाही,’ असा निरोप त्याने मध्यस्थातर्फे धाडला. शेवटी बाबुराव रानवडे यांनी मध्यस्थी केली. जावयाला आर्जवं केली. “”लग्नात खोडा घालू नका. सगळ्यांचंच हसं होईल. लग्नानंतर तीन महिन्यांत राहिलेले वीस रुपये दिले जातील. मी हमी घेतो.” असा शब्द दिला. त्यानंतर नरसिंह आणि कुंदा यांचे लग्न पार पडले.

खेड्यात पार पडलेले ते लग्न. जेवायला तेलच्या आणि गुळवणी केले होते. जोडीला झणझणीत आमटी आणि भात होता. लग्नानंतर कुंदा नांदायला पुण्यात आली. पण घरातले सासू, सासरे आणि पती नरसिंह कुंदाला हुंड्याच्या पैशावरून टोमणे मारू लागले. नानासाहेबांच्या गरिबीचा उद्धार करू लागले. “”ऐपत नव्हती तर लग्नाची घाई कशाला केली? थांबयचं होतं अजून दोन वर्षं. कुठं पोरगी पळून चालली होती?” असे फटकारे मारू लागले. त्यामुळे कुंदा घायाळ झाली. मनातल्या मनात कुढू लागली.

लग्नाला तीन महिने होऊन गेले, म्हणून जावयाने मध्यस्थाकडे टुमणे लावले. पैशाची मागणी केली. मध्यस्थानेही नानासाहेबांकडे, “”तेवढी हुंड्याची रक्कम देऊन टाका, म्हणजे पोरीचं नांदणं सुखाचं होईल.” असा निरोप धाडला. पण कर्जात अडकलेल्या नानासाहेबांना त्या वीस रुपयांची पूर्तता करणे जमले नाही. मध्यस्थाच्या माध्यमातून हुंड्याचे राहिलेले वीस रुपये मिळत नाहीत याची खात्री पटल्यावर जावईबापूंनी प्रत्यक्ष सासरेबुवांनाच पत्र पाठवलं. त्यात लिहिलं, “आपण ठरल्याप्रमाणे हुंड्याचे वीस रुपये दिले नाहीत. मध्यस्थाने शब्द दिला होता, पण तो आता अंगाला लागून घेत नाही. त्यांच्या शब्दावर विश्‍वास ठेवून मी लग्नाला उभा राहिलो. नाहीतर बोहल्यावर चढलो नसतो. मी माणसं ओळखत नाही; तर पैसे ओळखतो…’

नानासाहेबांनी ते पत्र वाचले आणि त्यातील तिखट शब्दांनी त्यांच्या काळजाला घरं पडली. ते शब्द मनावर घाव घालून गेले. काळजात रुतून बसले. एक कायमचा ओरखडा मनावर उमटून गेला. वीस रुपयांची पूर्तता करणे आवश्‍यक होते. पण 1956 साली ते वीस रुपये म्हणजे डोंगराएवढे मोठे वाटत होते. शेवटी नानासाहेबांच्या पत्नीने- पार्वतीबाईंनी त्यांना एक उपाय सुचवला. त्या म्हणाल्या, “”एवढा कसला विचार करताय? गोठ्यातली गाभण म्हैस विकून टाका. येत्या सोमवारी सासवडच्या बाजाराला न्या आणि पैसे देऊन टाका. ती माणसं न्हाईत, कसाब आहेत. त्यांचे पैसे दिले न्हाईत तर पोरीचं नांदणं होणार न्हाई. उगं भलतं सलतं कानावर यायला नको.”

पार्वतीबाईंचा विचार नानासाहेबांना पटला. ते मनात पुटपुटले, “दीड दोन महिन्यात म्हैस व्याली असती. पोरांनी दूध दही खाल्लं असतं. थोडं दूध विकून घरखर्च भागला असता; पण पोरांच्या नशिबात दूध नाही म्हणायचं.’ नानासाहेबांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. त्यांचा निर्णय पक्का झाला आणि सोमवारी सकाळी सकाळी नानासाहेब म्हशीला घेऊन सासवडची वाट चालू लागले. पारगावपासून सासवडपर्यंत म्हशीला घेऊन आठ मैल वाट तुडवायची होती. म्हणून ते भल्या पहाटेच निघाले. दुपारी बारा वाजता ते गुरांच्या बाजारात पोहोचले. काही गिऱ्हाईकं आली. बोलाचाली झाली आणि नाय होय करता करता सुंदरी म्हैस विकण्यात आली. तिचे रोख वीस रुपये आले. दुसऱ्याच दिवशी नानासाहेबांनी पुणे गाठले. ते जावयाच्या घरी गेले. हुंड्याची राहिलेली रक्कम देऊन टाकली. पैसे मिळाल्याचे कागदावर लिहून घेतले आणि चहापान, जेवणखान न करताच मुलीचा निरोप घेऊन ते माघारी फिरले. तेव्हा वडिलांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात उंबऱ्यापाशी उभे राहून कुंदा रडत होती. तेव्हा तिचे अश्रू निराश्रित होते आणि वेदना पोरकी झाली होती.

डॉ. दिलीप गरूड

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.