पायी हळूहळू चाला

पायी हळूहळू चाला, मुखाने राम राम बोला’ शेजारून जाणारं असं कुणीतरी म्हणत होतं, मनात आलं हळूहळू काय रस्त्यानं चालणंच मुश्‍कील झालंय. वाहनांची गर्दी सध्या इतकी झालीय की रस्त्यात व्यवस्थित आरामात चालणंही नशिबी राहिलेलं नाही. मध्यंतरी बहुतेक दोन वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात एका वाचकाचं पत्र आलं होतं, मला लेखक, लेखिका आठवत नाहीये, पण फार छान पत्र होतं ते. त्याचं नाव होतं, “घरात बसण्याचे दिवस.’

मला ते पत्र खूप आवडलं. खरोखरी बाहेर पडून वाहनांच्या गर्दीतून आपला जीव मुठीत धरून किंवा जीव धोक्‍यात घालून चालण्यापेक्षा नाईलाजानं घरात बसण्याचे दिवस आले आहेत. अशा अर्थानं ते पत्र होतं. मला खूपच पटलं ते पत्र. खरोखरी शहरातल्या कुठल्याही रस्त्यावरून कुठल्याही वेळेला चालत जायचं म्हणजे जीव धोक्‍यात घालण्यासारखंच आहे. झेब्रा क्रॉसिंगवरून देखील जीव मुठीत धरून चालायचे दिवस आले आहेत. कोण कुठून येऊन धक्‍का मारेल नी आपण खाली पडू याची शाश्‍वती नाही.

माझ्या आठवणीतलं पंचावन्न ते अगदी पासष्ट अडुसष्टचं पण पुणं खूप छान होतं. आमच्या लहानपणी पुणं हे मध्यमवर्गीय सालस मुलासारखं छान होतं. पुण्यात छान मोकळे रस्ते होते. छान मोकळ्या पर्वतीसारख्या टेकड्या होत्या. लोक पहाटे उठून पर्वतीवर आणि सगळ्या टेकड्यांवर फिरायला व्यायामाला जात होते. आता पण जातात पण प्रदूषणविरहित जागा म्हणून तिकडे जातात, रस्त्यानं चालणं पायी फिरायला जाणं दुरापास्त झालंय म्हणून जातात. त्यामुळेच हल्ली जॉगिंग पार्कची संख्या खूप वाढलीय, मोकळ्या ढाकळ्या रस्त्यांनी आपली असहायता दर्शवल्यावर काहीतरी उपाययोजना करायलाच पाहिजे ना! एक प्रकारानं ते छान आहे माणसांना वाहनरहीत रस्ता तरी चालायला मिळतो आपल्या मर्जीनुसार चालता येतं, धावता पण येतं.

“आधीच पुण्यात गुडगा गुडगा चिखल अन्‌ त्यात आता डांबर ओता म्हंजी पायच निगाया नक्‌, असा नगरसेवकांकडून विरोध होत असताना देखील त्यावेळच्या नगरपालिकेनं पुण्यात छान डांबरी रस्ते केले. मला आचार्य अत्र्यांच्या “कऱ्हेचे पाणी’ मधील वरील वाक्‍य आठवून हसू आले, पण मला टिळक रोडचा फूटपाथ नवीन कोरा करकरीत झालेला अजून लक्षात आहे. आम्ही त्या ओल्या फूटपाथवर पाय उमटवत हिराबागेत गेल्याचं आठवतंय. त्यावेळी एखाद दोन बसेस यायच्या. रस्त्यावरही वाहनं फारशी नसायची.

मुलं आपली आपली पर्वती, पेशवेपार्क किंवा तळ्यातला गणपती, पद्‌मावती, अरण्येश्‍वर, विठ्ठलवाडी अशा ठिकाणी चालत गेली तरी घरच्या लोकांना चिंता नसायची. आम्ही तर या वर सांगितलेल्या ठिकाणी सगळीकडे चालत जायचो. व्यायामापरी व्यायाम नि सहलीपरी सहल. खूप मजा यायची. चालण्याचे कष्ट जाणवायचे नाहीत आम्हाला. तेव्हा चालण्याला आरोग्याच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व माहिती नव्हतं, पण सगळीकडे चालतच जायचं असतं एवढं माहिती होतं. त्यावेळी रिक्षा पण खूप नव्हत्या. आम्ही पण आरामात कुठेही चालत जाऊन सुरक्षितपणे घरी यायचो. आता माणूस घरातून बाहेर पडला की तो सुरक्षितपणे घरी आला की दिवस पदरात असं म्हणायची वेळ आलीय कारण कुठेच सुरक्षितपणा राहिलेला नाहीये. आमच्या लहानपणी पुणं चालत होतं, आता पुणं वेगानं धावतंय, पळतंय, पण वाहनांवर स्वार होऊन. हळूहळू पायी चालण्याची फॅशन आता गेली. इतिहासजमा झालीय. केव्हाच!

उमा अनंत जोशी

Leave A Reply

Your email address will not be published.