अहमदाबाद – यजमान भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून मात केली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात एक हजार सामने खेळणारा पहिलाच संघ बनणाऱ्या भारतीय संघाने अविस्मरणिय विजयाची नोंद केली.
भारताच्या एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच सामना होता. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 28 षटकांत 4 गडी गमावून 178 धावा करत विजय प्राप्त केला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
कर्णधार व सलामीवीर रोहित शर्माने इशान किशनच्या साथित डावाची सुरुवात अत्यंत आक्रमक केली. या जोडीने 84 धावांची सलामी दिली. रोहितने आपले 44 वे अर्धशतक फटकावताना 51 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह 60 धावांची खेळी केली. यानंतर मात्र, धावांचा वेग वाढवताना रोहित बाद झाला. तो परतल्यावर अन्य प्रमुख फलंदाजांनी साफ निराशा केली.
रोहितच्या नेतृत्वात पहिल्यांदाच खेळतना कोहलीनेही अपेक्षाभंग केला. ऋषभ पंतही आपयशी ठरला. कोहली 8 तर पंत 11 धावा काढून बाद झाला. या सामन्यात पदार्पण करत असलेल्या दीपक हुडासह सूर्यकुमार यादवने संघाचा डाव सावरताना नाबाद अर्धशतकी भागीदारी करत 28 व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारने 36 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 34 तर दीपक हुडाने 32 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 26 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने 2 तर, अकिल हुसेनने 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी , यजुवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर यांच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने आपला विक्रमी हजारावा एकदिवसीय सामना खेळताना वेस्ट इंडिजचा डाव केवळ 176 धावांवर रोखला. या लढतीत नियमित कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत पाहुण्यांना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी अत्यंत सार्थ ठरवला.
वेस्ट इंडिजच्या भक्कम व वादळी फलंदाजीची वाताहत करत चहल व सुंदर यांनी त्यांची एकवेळ 7 बाद 79 अशी दयनिय स्थिती केली होती. त्याचवेळी माजी कर्णधार जेसन होल्डर याने फॅबियन ऍलन व अल्झारी जोसेफ यांना साथिला घेत संघाचा डाव सावरला. त्याने दमदार अर्धशतकी खेळी करत संघाला दीडशतकी धावांच्या पुडे मजल मारुन दिली. होल्डरने 71 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी केली. ऍलनने 29 तर, जोसेफने 13 धावा केल्या. वेस्ट इंडिजचा डाव 43.5 षटकांत 176 धावात संपुष्टात आला. भारताकडून यजुवेंद्र चहलने 4, तर वॉशिंग्टन सुंदरने 3 गडी बाद केले. प्रसिद्ध कृष्णाने 2 तर महंमद सिराजने एक गडी बाद केला.
धावफलक – वेस्ट इंडिज – 43.5 षटकांत सर्वबाद 176 धावा. (जेसन होल्डर 57, फॅबियन ऍलन 29, अल्झारी जोसेफ 13, यजुवेंद्र चहल 4-49, वॉशिंग्टन सुंदर 3-30, प्रसिद्ध कृष्णा 2-29, महंमद सिराज 1-26). भारत – 28 षटकांत 4 बाद 178 धावा. (रोहित शर्मा 60, इशान किशन 28, सूर्यकुमार यादव नाबाद 34, दीपक हुडा नाबाद 26, अल्झारी जोसेफ 2-45, अकिल हुसेन 1-46).