चेन्नई :- भारतात होत असलेली आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच पुढील वर्षी होत असलेली पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद मिळवले तर पॅरिसची पात्रता मिळवण्याची पहिली पायरी आम्ही पूर्ण करु शकू, असे मत भारताच्या पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी व्यक्त केले आहे.
आमच्या खेळात सातत्य राखणे, प्रतिस्पर्धी संघाचा बचाव भेदत तसेच मिळालेल्या कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करणे या गोष्टींवर भारतीय खेळाडूंना खूप मेहनत करावी लागणार आहे.
कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे व तो संघातील कमकुवत दुवे दूर करण्यासाठी सगळ्या खेळाडूंना प्रेरीत करेल, असा विश्वासही फुल्टन यांनी व्यक्त केला.
दरम्यान,आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं चीनचा 7-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली. या विजयामुळं जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेला भारतीय हॉकी संघ या 10 दिवसांच्या स्पर्धेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.