इंडियन यंगस्टर्स स्पिरीट

ऑस्ट्रेलियाविरूध्द गाबा मैदानावर ऐतिहासिक मालिका विजय

-सिराजने रचला पाया, पंतकडून कळस
-पुजारा, सुंदर यांची संयमी खेळी

ब्रिस्बेन – मराठमोळ्या अजिंक्‍य रहाणे याच्या नेतृत्वात यंगस्टर्स असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा मैदानावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची दमदार खेळी व त्याला साथ देताना चेतेश्वर पुजारा, कर्णधार अजिंक्‍य रहाणे व वॉशिंग्टन सुंदर यांनी दिलेल्या उपयुक्‍त साथीच्या जोरावर भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला चौथ्या व निर्णायक कसोटी सामन्यात 3 गडी राखून पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियात सलग दुसरी कसोटी मालिका जिंकणारा भारत पहिला आशियाई देश ठरला आहे.

नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत बदली कर्णधार अजिंक्‍य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला व बॉर्डर-गावसकर करंडक आपल्याकडेच राखला. या विजयात मोलाचा वाटा घेतलेला व विजयाचा शिल्पकार ठरलेल्या ऋषभ पंतने नाबाद 89 धावा केल्या.

मंगळवारी या सामन्याच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी भारताने सोमवारच्या बिनबाद 4 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी भारताला विजयासाठी 324 धावांची गरज होती. हिटमॅन रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी पुढे खेळ सुरू केल्यावर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने रोहितला 7 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा व गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी 118 धावा जोडताना संघाचा डाव सावरला. मात्र, अफलातून फलंदाजी करत असलेला गिल कसोटीतील पहिले शतक झळकावण्यात अपयशी ठरला. तो 91 धावांवर नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

गिलच्या जागी आलेल्या कर्णधार अजिंक्‍य रहाणेने पुजाराला साथ देताना धावांचा वेग वाढवला. पण त्याच प्रयत्नात रहाणे बाद झाला. त्याने 22 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह 24 धावा केल्या. रहाणे बाद झाल्यानंतर मयंक आग्रवालच्या जागी ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला. भारताच्या या फलंदाजीतील बदलावरून संघ विजयासाठी मैदानात उतरला आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पंतने पुजारासोबत 61 धावांची भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाने नवा चेंडू घेतल्यानंतर कमिन्सने पुजाराला 56 धावांवर बाद केले. पुजाराचे हे कसोटी कारकिर्दीतील सर्वात संथगतीने केलेले हे अर्धशतक ठरले. त्याने 50 धावा करण्यासाठी 196 चेंडू घेतले.
पुजाराच्या जागी आलेल्या आग्रवालने पंतसह पाचव्या गड्यासाठी 37 धावांची भागीदारी केली.

कमिन्सने आग्रवालला 9 धावांवर बाद करत भारताला पाचवा धक्का दिला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने पंतसह आक्रमक फलंदाजी केली. मात्र, तोदेखील वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात 22 धावांवर बाद झाला. सुंदरच्या जागी आलेला शार्दुल ठाकूर 2 धावा करून माघारी परतला. ठाकूर बाद झाला तेव्हा भारताला 3 धावांची गरज होती. अखेर पंतने चौकार खेचत विजयावर शिक्‍कामोर्तब करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक :

ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 115.2 षटकात सर्वबाद 369 धावा
भारत पहिला डाव – 111.4 षटकात सर्वबाद 336 धावा
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 75.5 षटकात सर्वबाद 294 धावा (मार्कस हॅरिस 38, डेव्हिड वॉर्नर 48, स्टिव्ह स्मिथ 55, कॅमेरुन ग्रीन 37, पॅट कमिन्स नाबाद 28. महंमद सिराज 73-5, शार्दुल ठाकूर – 61-4, वॉशिंग्टन सुंदर 80-1)
भारत दुसरा डाव – 97 षटकात 7 बाद 329 धावा (रोहित शर्मा 7, शुभमन गिल 91, चेतेश्‍वर पुजारा 56, अजिंक्‍य रहाणे 24, ऋषभ पंत नाबाद 89, मयंक आग्रवाल 9, वॉशिंग्टन सुंदर 22, शार्दुल ठाकूर 2, नवदिप सैनी नाबाद 0. पेट कमिन्स 55-4, नॅथन लियॉन 85-2, जोश हेजलवुड 74-1)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.