कांगारूंच्या देशात : नक्षा उतरवला

-अमित डोंगरे

आम्ही वर्णद्वेष करू, स्लेजिंग करू विजयासाठी वाट्टेल ते करू असे गर्वाने सांगणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा नक्षा भारतीय संघाने त्यांच्याच भूमीत उतरवला. तीन दशकांपेक्षाही जास्त काळ ब्रिस्बेनच्या गाबावर आम्हाला कोणी पराभूत करू शकलेले नाही, असा टेंभा मिरवणाऱ्या कांगारूंची भारतीय वाघांनी शिकार केली व दोन वर्षांपूर्वीच्या मालिका विजयाची ( #AUSvIND ) भारतीय संघाने पुनरावृत्ती केली. 

गाबा मैदानावर सलग 28 सामने जिंकलेल्या यजमान संघावर भारताच्या अननुभवी संघाने मात केली. त्यांचा कर्णधार टीम पेनीसह अनेक आजी-माजी खेळाडूंच्या मुक्‍ताफळांवर आपल्या एकाही खेळाडूने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्‍त केली नाही. त्यांना आपण आपल्या कामगिरीने प्रत्यक्ष मैदानावरच उत्तर दिले. क्रिकेट हा अनिश्‍चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते ते खोटे नाही.

अॅडलेडचा सामना गमावल्यानंतर भारतीय संघाला या मालिकेत काही संधी आहे हे कोणालाही वाटले नाही. पण तरीही भारतीय संघाने पलटवार करत ही मालिका 2-1 अशी जिंकत टीकाकार व सो-कॉल्ड तज्ज्ञ मंडळींना चांगलीच चपराक दिली. या मालिकेतील भारतीय संघाकडे पाहिले तर या विजयाचे मोल जास्तच वाटते. संघातील प्रमुख खेळाडूंसह एकूण 10 खेळाडू दुखापतीने त्रस्त झाले व संघात नवोदित खेळाडूंना संधी दिली गेली. त्यावेळी आपण ही मालिका जिंकू याची ग्वाही कोणीही दिलेली नव्हती तरीही त्यांनी इतिहास ( #HistoryCreated ) रचला.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्‍य रहाणेने ( #AjinkyaRahane ) संघाचे नेतृत्व करताना आपली हुशारी दाखवली. हा विजय कोणा एका खेळाडूचा नसून सांघिक आहे. भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात त्यांना चारशे धावांच्या आत गुंडाळले. त्यानंतर भक्कम फलंदाजी केली. पिछाडीवर पडूनही पुन्हा एकदा महंमद सिराज आणि कंपनीने त्यांना त्रिशतकी धावांच्या आत रोखले व विजयासाठी आवश्‍यक धावा 7 गडी गमावून केल्या व विजयासह मालिकाही जिंकली.

या विजयात मोलाचा वाटा सिराज, शार्दुल ठाकूर यांच्या गोलंदाजाचा तर चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर यांच्या जबाबदार फलंदाजीचाही आहे. पंतबाबत बोलावेच लागेल. यापूर्वी त्याच्या गुणवत्तेवर तसेच त्याच्या क्षमतेवरच शंका घेतली जात होती. मात्र, या डावात त्याने जी जिगर दाखवली व आक्रमक फलंदाजी केली ती पाहता त्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे. संघात पुजारा का असावा याचे उत्तर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना निश्‍चितच मिळाले असेल. नांगर टाकून खेळपट्टीवर उभे राहणे कशाला म्हणतात हे त्याच्याकडे पाहून कळते.

यजमान ऑस्ट्रेलियाने सगळे पर्याय वापरून पाहिले. स्लेजिंग केले, ताशेरे मारले, माइंड गेमही करून पाहिला. त्यांच्या आजी-माजी खेळाडूंनी मीडिया स्ट्रॅटेजीही केली. त्यांना हातभार लावताना त्यांच्या प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टीकाही करत भारतीय संघाचे मनोधैर्य खच्ची करण्याचाही प्रयत्न केला. बाय हुक ऑर क्रुक विजय मिळवणारच असे ध्येय असलेल्या ऑस्ट्रेलियाचा नक्षा भारतीय संघाने उतरवला हेच खरे. आता भारतीय संघ मायदेशी परतताना अनुभवच नव्हे तर वर्चस्वाची शिदोरी घेऊन परतणार याचाच सर्वाधिक अभिमान वाटतो. अखेर करून दाखवले असेच भारतीय संघाबाबत म्हणावेसे वाटते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.