नवी दिल्ली – केंद्र सरकारने गुगल आणि ऍपलला “टीक-टॉक’ हे ऍप डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. “टीक-टॉक’ ऍपवर बंदी घालण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले. या ऍपच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ प्रसारीत केले जात असल्यामुळे सरकारने हे ऍप हटवण्याचे आदेश दिले आहेत.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणी सुनावणीसाठी 22 एप्रिलची तारीख निश्चित केली. या आदेशामुळे “प्ले स्टोअर’मधून टीक-टॉक ऍप्लिकेशन डाऊनलोड करता येणार नाही. पण ज्या लोकांनी आधीच हे ऍप डाऊनलोड केले आहे. ते याचा वापर करु शकतात.
“टीक-टॉक ऍपचा गैरवापर होत असल्याने त्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मागच्या तिमाहीत ऍप स्टोर आणि गुगल प्लेमधून सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या जगभरातील ऍपमध्ये टीक-टॉक तिसऱ्या स्थानावर होते. मार्च तिमाहीत जगभरातून टीक टॉकशी 18.8 कोटी नवे युजर्स जोडले गेले.