अबाऊट टर्न: टिक-टॉक…

हिमांशू

सोशल मीडिया म्हटल्यावर व्हॉट्‌स ऍप आणि फेसबुक… फार-फार तर ट्विटरपर्यंत माध्यमं आम्हाला माहीत आहेत. व्हॉट्‌स ऍप आमच्याकडे आहे. फेसबुक असून नसल्यासारखं आहे आणि ट्विटरवर जे काही चालतं, ते इतर माध्यमांमधूनच आम्हाला समजतं. यापलीकडे सोशल जगतातलं आम्हाला फारसं कळत नाही. आमचं तंत्रज्ञानाशी वैर आहे, अशातलाही भाग नाही. बरंच तंत्रज्ञान आम्ही रोजच्या रोज वापरतो आणि काही तंत्रांवर आमची हुकूमतसुद्धा आहे. परंतु सोशल माध्यमं हाताळण्याइतका वेळ मात्र आमच्याकडे नसल्यामुळं त्या बाबतीतलं ज्ञान फार तोकडं आहे. म्हणूनच जेव्हा “टिक टॉक’वर बंदी घालण्याचा हुकूम सरकारकडून आला, तेव्हा “”टिक-टॉक म्हणजे काय रे भाऊ…” इथून आमची सुरुवात झाली.

एका सहृदयी मित्रानं आम्हाला या प्रकाराची साद्यंत माहितीही उदारपणे दिली. ती ऐकताना हे व्हिडिओ बनवण्याचं साधन आहे, हे आम्हाला समजत होतं. परंतु ते सोशल माध्यमसुद्धा आहे, हे समजायला वेळ लागला. एकाच ऍपमध्ये व्हिडिओ बनवायचे, तिथंच अपलोड करायचे, तिथंच कुणा-कुणाला फॉलो वगैरे करायचं, व्हिडिओ लाइक वगैरे करायचे आणि आपल्याला मिळणारे लाइक, फॉलोअर्स मोजायचे वगैरे… अस्तु! हे एवढं समजून घेतल्यानंतर अशा अत्यंत चांगल्या माध्यमावर बंदी का घालतायत, हा वेडगळ प्रश्‍न आम्हाला नेहमीप्रमाणं पडलाच. यात वाईट काय, याचा शोध सुरू झाला.

बातमीत म्हटलं होतं की, या माध्यमातून अश्‍लील मेसेज पाठवले जातात, म्हणून त्यावर बंदी आणण्याची मागणी आधी मद्रास उच्च न्यायालयात करण्यात आली. तिथं बंदी घातली गेल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयानं बंदीला स्थगिती द्यायला नकार दिला आणि सरकारनं लगेच हे ऍप डिलीट करायचे आदेश गूगलला दिले. आमच्या अपूर्ण माहितीनुसार, गाणी किंवा डायलॉग वगैरे आपल्याला “टिक-टॉक’च्या माध्यमातून आपल्या आवाजात डब करता येतात. म्हणजे मूळ संवाद दुसऱ्याचाच; पण तो आपल्या आवाजात रेकॉर्ड करून ऐकता येतो. शिवाय, काही ऍक्‍शन किंवा गाणी ओरिजिनल ठेवून त्यावर आपल्या हालचाली शूट करून घेता येतात. गमतीसाठी किंवा खेळ म्हणून विकसित केलेलं माध्यम, असं जरी वरवर पाहता वाटत असलं, तरी या ऍपच्या माध्यमातून कुणाकुणाचं “टॅलेन्ट’ दिसून आलं आणि संबंधितांना सिनेमा-मालिकांमध्ये संधीही मिळाली, असं आम्हाला आमच्या मित्रानं सांगितलं. मित्राचं बोलणं सुरू असताना आम्हाला व्हॉट्‌स ऍपवर आलेले काही व्हिडिओ आठवले. सिनेमातले डायलॉग डब करून त्याला राजकीय रंग दिल्याची उदाहरणं आठवली. कदाचित, ते व्हिडिओ याच ऍपवर तयार केलेले असावेत. मग या माध्यमाचा दुरुपयोग नेमका कसा करणं शक्‍य आहे, हे हळूहळू समजायला लागलं.

खरंतर सध्या राजकारणातसुद्धा माणसं दुसऱ्यांचे संवाद आपल्या आवाजात “डब’ करून म्हणू लागलीत. त्यासाठी सोशल मीडियाचीसुद्धा गरज नाही. व्यासपीठावर व्यक्ती वेगळीच दिसते आणि डायलॉग दुसऱ्याच व्यक्तीचे ऐकू येतात. तो विषय सोडा! पण या “टिक-टॉक’च्या निमित्तानं आपली नवी पिढी कशा-कशात अडकत चाललीय, हे पाहून भीती वाटल्यावाचून राहत नाही. कुणी कशात गुंतावं, हा व्यक्तिगत प्रश्‍न; पण आभासी जग वास्तव जगापेक्षा मोठं होताना पाहून हादरायला होतं, हे खरं!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.