पुणे – राज्यातील शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्चच्या दुसऱ्या टप्प्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी अदा करावे लागणार आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी रामदास धुमाळ यांनी शिक्षण संचालकांना बजाविले आहेत.
करोनामुळे आरोग्य व आर्थिक आपत्तीवर मात करण्यासाठी शासनाने आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन खर्चात काटकसर करणे व काही खर्च पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्चचे वेतन दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये, सैनिकी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महापालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना द्यावयाच्या वेतनाची टक्केवारी देखील निश्चित करण्यात आली होती.
आता दुसऱ्या टप्प्यात उर्वरित वेतनाची टक्केवारी सर्व शिक्षकांना 25 टक्के प्रमाणे व गट ब मधील असल्यास 50 टक्के प्रमाणे प्रदान करण्याबाबत आदेश काढण्यात आलेले आहेत. शालार्थ प्रणालीमध्ये जुलै या महिन्याची वेतन देयके तयार करण्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. शालार्थ प्रणालीतील कार्यसंरचेनुसार एका वेळी एखादा कर्मचारी केवळ एकाच बिल ग्रुपला जोडता येतो. त्यामुळे आहरण व संवितरण अधिकारी यांनी मार्चच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित वेतनाचे प्रदान करण्यात येणार आहे.