पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयता १ ली ते १२ वीसाठी पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून पोर्टलवर २१ हजार ७६८ रिक्त जागांच्या जाहिराती प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून ते लॉक करण्याची सुविधा सुरु करण्यात आली असून ती ९ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर ३४ जिल्हा परिषदांच्या १२ हजार ५२२,१८ मनपाच्या २ हजार ९५१, ८२ नगर पालिका व नगरपरिषदांच्या ४७७ व १ ह्जार १२३ खाजगी शैक्षणिक संस्थांच्या ५ हजार ७२८ अशा एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवि १ लाख ६३ हजार उमदवारांनी स्वमान्यता प्रमाणपत्र नोंदणी पूर्ण केलेली आहे. जाहिराती प्रसिध्द झाल्यानंतर काही वेळातच तब्बल ७ हजार ८७० उमेदवारांनी प्राधान्यक्रमही जनरेट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय तर खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मुलाखती घेऊन शिक्षक भरती होणार आहे. मराठी माध्यमासाठी सर्वाधिक १८ हजार ३७३ तर इंग्रजी माध्यमासाठी केवळ ९३१ शिक्षक भरतीच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत.
एकंदरीतच या भरतीप्रक्रियेमध्ये माध्यम, बिंदुनामावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयांबाबत काही घटकांकडुन एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर केल्या होत्या. मात्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी कोणत्याही दबाव अथवा खोडसाळपणाला थारा न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाच्या विविध विषयांवरच्या धोरणाचे तंतोतंत पालन करून ही भरतीप्रक्रिया राबविण्याला प्राधान्य दिलेले आहे.
रिक्त पदांचा तपशील
आरक्षण निहाय रिक्त पदे – अनुसूचित जाती-३१४७, अनुसूचित जमाती-३५४२, विमुक्त जाती (अ)- ८६२, भटक्या जमाती (ब)-४०४, भटक्या जमाती (क)-५८२, भटक्या जमाती (ड)-४९३, विशेष मागास प्रवर्ग-२९०, इतर मागास प्रवर्ग-४०२४, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक-२३२४, खुला-६१७० याप्रमाणे आहेत. गट निहाय रिक्त पदे- इ. १ ते ५ वी-१०२४०, इ. ६ ते ८ वी – ८१२७, इ. ९ ते १० वी -२१७६, इ. ११ ते १२ वी – ११३५ याप्रमाणे आहेत. माध्यमनिहाय रिक्त पदे- मराठी-१८३७३, इंग्रजी-९३१, उर्दू-१८५०, हिन्दी-४१०, गुजराथी-१२. कन्नड-८८, तामिळ-८, बंगाली-४, तेलुगू-२ याप्रमाणे आहेत. पदभरती प्रकारनिहाय रिक्त पदे- मुलाखतीशिवाय-१६७९९, मुलाखतीसह-४८७९ याप्रमाणे आहेत.
“शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.”
– सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त