नागरिकांसाठी ठरतेय दिलासाजनक बाब
पिंपरी – शहरात आत्तापर्यंत 2 लाख 78 हजार 315 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 2 लाख 74 हजार 161 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 98.5 टक्के इतके आहे. ही बाब शहरवासीयांसाठी दिलासाजनक आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात करोनाची पहिली लाट आली. त्या वेळी करोनाविषयी नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण होते. करोना बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी होती. त्यामुळे देशात आणि राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. दरम्यान, टप्प्याटप्प्याने हे निर्बंध शिथिल करण्यात आले.
चालू वर्षी पुन्हा मार्च महिन्यात करोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर दररोज एक ते दीड हजार बाधित रुग्ण आढळू लागले. त्यानंतर त्यांचे प्रमाण हळूहळू घटत गेले. सध्या बाधित रुग्णांचे प्रमाण दररोज 50 रुग्णसंख्येच्या आत आले आहे. करोनाचा हा कहर काहीसा थंडावला असताना पुन्हा ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे.
शहरात आजपर्यंत एकूण 2 लाख 78 हजार 315 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 2 लाख 74 हजार 161 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 98.5 टक्के इतके रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर करोनाने 4 हजार 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या केवळ 366 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणातील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे.
चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण 12 टक्के
शहरात आत्तापर्यंत एकूण 23 लाख 17 हजार 737 करोना संशयितांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी 2 लाख 78 हजार 315 इतक्या नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे आढळले. टक्केवारीत हे प्रमाण 12 टक्के इतके अत्यल्प आहे. एकंदरीतच करोना चाचण्यांच्या प्रमाणात बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. ही सकारात्मक बाब आहे.