जयपूर – एका कथित तपस्वी बाबाने एकाच कुटूंबातील चार महिलांवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. योगेंद्र मेहता असे या भोंदू बाबाचे नाव आहे. हा बाबा स्वत: ला देव म्हणून घ्यायचा आणि त्याच्याकडे जाणाऱ्या महिलांना प्रसाद म्हणून भांग द्यायचा, ते खाल्ल्यानंतर अर्धवट बेशुद्ध पडलेल्या महिलांवर तो बलात्कार करायचा.
या घटनेप्रकरणी कुटुंबीयांनी भंकरोटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याबाबत ढोंगी बाबा योगेंद्र मेहता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मेहता पसार झाला होता. मात्र पोलिसांनी छळा लावून त्यास अटक केली आहे. पोलीस अधिकारी मुकेश चौधरी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
एका पीडित महिलेने दिलेल्या माहितीनूसार तिचें लग्न वर्ष 1998 मध्ये जयपूरच्या बिंदायका येथे झाले होते. तिच्या सासरी कुलदेवता एक तपस्वी बाबा होते. मात्र त्यांच निधन झालं होतं. त्यांच्या आश्रमात गेल्या 15 वर्षांपासून महिलेच कुटुंब जात होतं. तपस्वी बाबांच्या मृत्यूनंतर या ढोंगी मेहतानं त्यांच्या गादीवर कब्जा केला होता. त्याचं मुख्य आश्रम मुकुंदपुरा येथे आणि इतर दोन सीकर आणि दिल्ली रोडवर आहेत. तो स्वत:ला तपस्वी बाबा आणि आपण देव असल्याचे सांगायचा.
पीडित महिला आपल्या पतीसमवेत आश्रमात जात असे. व तेथे सेवा-पूजेसाठी तीन-चार दिवस राहत असे. एके दिवशी मेहतानं प्रसाद देण्याच्या बहाण्याने आश्रमाच्या छतावरील खोलीत बोलावून घेतले व प्रसाद म्हणून एक गोळी खायला दिली. गोळीमुळे महिलेला गुंगी आल्यासारखे झाले. नंतर मेहता म्हणाला की, तू आता देवाचं ध्यान कर आणि मला सर्व तुझं काही सोपव. गोळीच्या नशेमुळे महिलेवर मेहताने बलात्कार केला. मात्र पतीच्या सांगण्यावरून जेव्हा ती पुन्हा आश्रमात गेली, तेव्हा मेहतानं तिच्यावर पुन्हा बलात्कार केला आणि कोणालाही याबाबत न सांगण्याची धमकी दिली अन्यथा तुमचा विनाश करण्याची भीती घातली. अशी माहिती पीडित महिलेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी महिलेचा पती आपल्या 20 वर्षीय मुलीला घेऊन आश्रमात निघाला होता. त्यावेळी तिनं मुलीला आश्रमात नेण्यास मनाई केली, याबाबत पतीनं तिला विचारणा केल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर घरातील सर्वांनी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की या महिलेच्या एका मोठ्या आणि दोन छोट्या जावांवरही अशाचप्रकारे मेहताने अत्याचार केला होता.