ओतूर -ओतूर (ता. जुन्नर) परिसरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन कारवाई करीत नसल्याची ओरड होत होती. अखेर पोलीस प्रशासन पुन्हा जागे झाले आणि त्यांनी करावाईला प्रारंभ केला.
प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन व्हावे तसेच व्यावसायिकांनी देखील आपल्याला दिलेल्या सूचना पाळून आप आपले व्यवसाय करावेत अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे असे ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले.
निर्बंध पाळले गेले नाही तर गुन्हे देखील दाखल करण्यात येतील असेही ते म्हणाले. लॉक डाऊनचे नियम धाब्यावर बसवून अनेक व्यवसायिक आपले व्यवसाय करताना मनाजोगे वागताना दिसत आहेत अशांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत तर काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
नागरिक, व्यावसायिकांनी प्रशासनास मदत करावी असे आवाहानही करण्यात येत आहे. ओतूर बसस्थानक परिसरात मंगळवारी (दि. 25) विनामास्क फिरणाऱ्यांवर परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे. टी. पवार, आर. व्ही. बनकर, पोलीस मित्र एन. के. साबळे, ए. एस. काळे, एम. यू. ठिकेकर यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली.