पाटेकरांविरोधात पुरावे नसल्याचे तनुश्रीने केले अमान्य

मुंबई – अभिनेते नाना पाटेकर यांनी केलेल्या विनयभंगाच्या प्रकरणाविषयी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सबळ पुरावे नसल्याचा मुंबई पोलिसांचा दावा तक्रारकर्ती अभिनेत्री तनुश्री दत्ताने फेटाळून लावला आहे. गेल्या महिन्यात 12 जून रोजी अंधेरीच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे ओशिवरा पोलिस ठाण्याने या तपासासंदर्भात “बी समरी’ अहवाल दाखल केला आहे. एखाद्या प्रकरणात तपासादरम्यान काहीही पुरावे आढळून न आल्यास “बी समरी’ अहवाल दिला जातो. या अहवालानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करता येत नाही.

मात्र, तनुश्रीने या अहवालावर आपला आक्षेप नोंदवला आहे. तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले की, केवळ बी समरी अहवालावरुन पाटेकर यांना निर्दोष मानणे घाईचे होईल. न्यायालयाने या अहवालाविषयी आमचे मत मांडायला 7 सप्टेंबरची मुदत दिलेली आहे. त्यावेळी आम्ही आमचे म्हणणे सादर करणार आहोत.

वर्ष 2008 मध्ये “हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी पाटेकर यांनी आपले लैंगिक शोषण केल्याची तक्रार तनुश्रीने तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजे ऑक्‍टोबर 2018 मध्ये दाखल केली होती. त्यादरम्यानच अशा लैंगिक शोषणाविरोधात “मीटू’ हे अभियान समाज माध्यमांतून चांगलेच गाजले होते. अनेक महिलांनी भूतकाळात त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती धाडसाने उघड केली होती.

तनुश्रीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पाटेकर यांच्यासह नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दीकी आणि चित्रपटाचा दिग्दर्शक राकेश सारंग यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 354 आणि 509 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, “बी समरी’ अहवालामुळे सर्वच आरोपी निर्दोष सुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तनुश्रीने हा अहवाल आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.