कळस, धानोरी, लोहगावात कोरड; दोन दिवस पाणी बंद

मुळा नदीतून जाणारी मुख्य जलवाहिनी फुटली

पुणे – महापालिकेच्या नवीन होळकर जलशुद्धीकरण केंद्राकडून विद्यानगरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी मुळा नदीच्या आत फुटल्याने कळस, धानोरी, लोहगाव, विमाननगर तसेच विश्रांतवाडीच्या काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नदीखाली सुमारे 5 फूट ही जलवाहिनी फुटल्याने तिच्या दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस या भागातील पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्‍यता आहे.

होळकर पंम्पिंग स्टेशनपासून विद्यानगरकडे जाणारी ही सुमारे 40 मिमी व्यासाची जलवाहिनी असून सुमारे 22 वर्षांपूर्वी ती टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी नदीपात्रातून असून कळस, धानोरी, लोहगाव, विमाननगर तसेच विश्रांतवाडीच्या काही भागातील सुमारे अडीच ते साडेतीन लाख नागरिकांना या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. रविवारी सकाळी होळकर जलकेंद्रातून पाणी सोडण्यात आल्यानंतरही विद्यानगर येथील पाण्याची टाकी भरत नसल्याने संशय आल्याने पाणीपुरवठा विभागाने या जलवाहिनीची उलट्या दिशेने तपासणी करण्यात आली.

त्यावेळी होळकर पुलाबाजूला ही जलवाहिनी पाच फूट खोल पाण्यात फुटली असल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने होळकर जलकेंद्रातून पाणीपुरवठा थांबविण्यात आला असून लवकरच दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

नदीच्या पाण्याने दुरुस्तीला अडचण
नदीत पाणी नसल्यास ही जलवाहिनी बाहेर असते. मात्र, सध्याच्या पावसाने नदीच्या पाण्याचा स्तर पाच फुटांनी वाढला आहे. परिणामी, जलवाहिनी पाण्याखाली गेली आहे. आता तिची दुरुस्ती तसेच नेमकी तपासणी करायची असल्यास महापालिकेस पाणबुड्यांची गरज आहे. मात्र, रविवार तसेच पालखीमुळे अनेक पाणबुड्या इतरत्र पाठविण्यात आल्याने पालिकेस पाणबुड्या मिळण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे पाणी ओसरले, अथवा पाणबुड्या मिळाल्या तर जलवाहिनीची दुरुस्ती शक्‍य होणार आहे.

अशी फुटली जलवाहिनी
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नदीकाठावरून ही जलवाहिनी असून तिला आधार देण्यासाठी खालील बाजूस मातीचा भरावही घालण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नदीत पाण्याचे प्रमाण वाढल्याने तसेच प्रवाहाने जलवाहिनीखालील भराव वाहून गेला आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या दोन जोडांवर पाण्याचा भार येऊन ही जलवाहिनी नदीत पाच फूट खाली फुटली आहे.

ही जलवाहिनी फुटल्याचे सकाळी 11च्या सुमारास निदर्शनास आले आहे. त्यानुसार, आवश्‍यक त्या दुरुस्तीची तयारी करण्यात आली. यासाठी पाणबुड्या तातडीने उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही दुरूस्ती दोन दिवसांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असून पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल.
– व्ही. जी कुलकर्णी, विभागप्रमुख, पाणीपुरवठा.

Leave A Reply

Your email address will not be published.