मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदाचा मिलिंद देवरा यांचा राजीनामा

मुंबई – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसमध्ये सध्या घडत असलेल्या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी देण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आपल्या पदाचा राजीनामा सोपवताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय पॅनेलचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीचा सामना करणे हे कॉंग्रेससाठी मोठे आव्हान असल्याचे देवरा यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले आहे.

निरुपम यांची टीकात्मक टिप्पणी
मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आज पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनी त्यावर टीकात्मक टिप्पणी केली आहे. त्यांनी देवरांचे नाव न घेता हा राजीनामा आहे की, वरच्या पातळीवर जाण्याची शिडी?, राजीनाम्यात त्यागाची भावाना अंतर्भुत असते, मात्र इथे तर दुसऱ्याच क्षणी राष्ट्रीय पातळीवरील पद मागितले जात आहे. अशा कर्मठ लोकांपासून पक्षाने सावध राहायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

देवराच्या कार्यालयातून आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे आणि के.सी. वेणुगोपाल यांना सांगण्यात आले आहे. हे पाऊल एआयसीसीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनामा देण्याबरोबरच एकनिष्ठा आणि सामूहिक जबाबदारीची अभिव्यक्ती म्हणून उचलण्यात आले, असे त्यात म्हटले आहे.
देवरा म्हणाले, लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही तयारी करीत आहे. तसेच पक्ष वाढीसाठी मी मुंबई अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली होती. नवी दिल्लीत 26 जून रोजी राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्‍त केली होती, असे देवरा यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातून मिलींद देवरा यांचा शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी पराभवाचा केला होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×