चेन्नई – तामिळनाडूतील एका मुलीने बारावीत सर्व विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवून एक अनोखा राष्ट्रीय विक्रम केला आहे. दिंडीगुल जिल्ह्यातील एस नंदिनीने ही कामगिरी केल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारी परीक्षा संचालनालयाने सोमवारी परीक्षेचा निकाल जाहीर केला. नंदिनीने जिल्ह्यातील एका सरकारी अनुदानित संस्थेत शिक्षण घेतले आणि बोर्डाची परीक्षा दिली. तिला तामिळ, इंग्रजी, अर्थशास्त्र, वाणिज्य, लेखा आणि कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स अशा सहा विषयांत 600 पैकी 600 गुण मिळाले.
नंदिनी म्हणते की तिला ऑडिटर बनायचे आहे. आपण कोणतीही खासगी शिकवणी न लावता, घरातले काम सांभाळून अभ्यास केल्याचे तिने सांगितले आहे. तामिळनाडूमध्ये 12वीच्या परीक्षेला बसलेल्या आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 94.03 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 96.38 तर मुलांचे 91.45 इतके आहे. मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेला एकूण 8,03,385 विद्यार्थी बसले होते.