नवी दिल्ली- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तथा पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशावरून आज अटक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत तसेच अल कदिर ट्रस्ट प्रकरणी अटक केल्याचे सांगण्यात आले.
पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या वकील मुसरत चीमा यांनीही खान यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली त्यांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक प्रकरणात जामीन मिळण्यासाठी इम्रान खान आज न्यायालयात आले होते. ते पहिल्या दिवसापासून पाकिस्तानी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात वक्तव्ये करत होते.
खान यांना अटक का झाली ?
इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यात पोलीस महानिरीक्षक म्हणाले, ”की इम्रान खान यांना कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे’. सध्या परिस्थिती सामान्य आहे. तसेच परिस्थिती अभावे कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच, इमरान खान यांना अटक करताना कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. अशी नाराजी इस्लामाबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिश यांनी व्यक्त केली आहे.