Tamil Nadu assembly elections : अण्णाद्रमुक आणि पीएमकेमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब

चेन्नई – तामीळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ अण्णाद्रमुकने शनिवारी मित्रपक्ष पीएमकेबरोबरच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब केले. अण्णाद्रमुक आणि भाजपमध्येही जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू झाल्या आहेत.

तामीळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी 6 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पुढच्याच दिवशी अण्णाद्रमुक आणि पीएमकेमधील जागावाटपाविषयी सहमती झाली.

त्यानुसार, पीएमकेच्या वाट्याला 23 जागा आल्या आहेत. अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत भाजप, डीएमडीके आणि तामीळ मनीला कॉंग्रेस (टीएमसी) हे पक्षही सहभागी होणार आहेत. त्यांच्याशीही अण्णाद्रमुकने जागावाटपाबाबत स्वतंत्र चर्चा सुरू केल्या आहेत.

अण्णाद्रमुक आणि भाजपमध्ये शनिवारी जागावाटपासाठी चर्चेची पहिली फेरी झाली. लवकरच त्यांच्यात जागांबाबत सहमती होण्याची चिन्हे आहेत. भाजप त्या राज्यात 60 जागा लढवण्यास उत्सुक आहे.

तेवढ्या जागा अण्णाद्रमुक सोडणार का, हे लवकरच पुढे येईल. अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीची मुख्य लढत द्रमुक-कॉंग्रेस आघाडीशी होण्याची शक्‍यता आहे. ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांचा मक्कल निधी मय्यम हा पक्षही यावेळी रिंगणात उतरला आहे. त्यामुळे तामीळनाडूतील निवडणुकीची रंगत वाढली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.