संगमनेर – अपक्ष उमेदवार म्हणून मैदानावर उतरल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने सत्यजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. शुक्रवारी (दि. 20) सकाळीच तांबे यांनी खांडेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला. तांबे यांनी संगमनेरातील इतरही देवतांचे दर्शन घेतले. महाआघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला असला, तरी महाआघाडीचा घटक असलेल्या कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र तांबे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी पाठिंब्याबाबत सर्व पक्षांना आवाहन केले होते. मात्र, महाआघाडीने पाठिंबा देण्यास नकार दिला; शिवाय त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. भाजपने अद्यापपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नाही. दरम्यान, कोणी काय भूमिका घेतली किंवा घेणार याकडे लक्ष न देता तांबे यांनी आज तालुक्यातील खांडेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच सय्यद बाबा दर्ग्यावर चादर चढवून प्रचाराला सुरवात केली.
तांबे यांनी सांगितले की, आज पक्ष सोबत नसला, तरी अनेक तरुण, वेगवेगळ्या विचारधारेचे कार्यकर्ते माझ्यासोबत उभे राहिले आहेत. एक तरुण नेतृत्व नक्कीच पदवीधरांच्या प्रश्नासाठी काम करेल असा विश्वास त्यांना वाटत असल्याने पक्षीय राजकारणापलीकडे आपल्याला पाठिंबा देत आहे.