इस्लामाबाद – पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरून काल रात्री दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारामुळे दोन्ही बाजूंकडील जीवितहानीचे वृत्त आहे.
अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिया प्रांतातील दंद ए पाटन जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यदलांकडून एक चेक पोस्ट उभारण्यात येत होते. मात्र तालिबानी सुरक्षा दलांनी त्यांना अटकाव केला. त्यावर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार करायला सुरुवात केली, असे तालिबानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तर अफगाणिस्तानच्या सीमेवरून दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे 3 सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. हा हल्ला खैबर पख्तुन्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात सीमेवरील सुरक्षा दलाच्या चौकीवर झाल्याचे पाकिस्तानी निवेदनात म्हटले आहे.
परस्परातील सामंजस्यानुसार अफगाणिस्तान आणि पाकिस्तानी सीमेजवळ कोणतीही लष्करी चौकी उभारली जाऊ शकत नसल्याचे तालिबान सरकारचा उपप्रवक्ता बिलाल कारिमी याने म्हटले आहे.
मात्र पाकिस्तानी सैनिकांनी ही चौकी उभारण्याचा प्रयत्न केला. त्याला तालिबानी सुरक्षा दलाने अटकाव केल्यावर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला, असे त्याने सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून तालिबानी नेत्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आल्याचेही कारिमी याने सांगितले.