माजी खासदार गजानन बाबर यांच्या पत्राची दखल
पिंपरी – जेनेरिक औषधांना प्रोत्साहन द्यावे तसेच देशातील सर्व डॉक्टरांना जेनेरिक औषधे लिहून देण्याची सक्ती करावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यांच्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. अवर सचिव दीपककुमार मिश्रा यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे, स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने देखील बाबर यांच्या पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाकडून प्राप्त सूचनांनुसार राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (नॅशनल मेडिकल कौन्सिल) यांना पत्राद्वारे चौकशी व सूचना यावर योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने 21 एप्रिल 2017 रोजी काढलेल्या परिपत्रकात देशातील सर्व डॉक्टरांनी जेनेरिक औषधांचा बहुतांश वापर आपल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये करणे गरजेचे आहे. मात्र, त्याचे सध्या सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. बहुतांश डॉक्टर या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येते. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान कार्यालयाकडून प्राप्त सुचनांनुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
आरोग्यावरील खर्चात कपात शक्य
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जेनेरिक औषधांचा वापर केल्यास विकसित देशांतील आरोग्यावरील खर्चात 70 टक्के कपात होऊ शकते. विकसनशील देशांमध्ये त्यापेक्षा जास्त बचत होऊ शकते. देशाच्या ग्रामीण भागातील सुमारे 30 टक्के लोकांना औषधांचा खर्च झेपत नसल्यामुळे त्यांना दुखणी अंगावर काढावी लागतात. या पार्श्वभूमीवर जेनेरिक औषधांचा वापर वाढल्यास एकूण खर्चात किमान 11 टक्के बचत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.