पुणे -सामाजिक संदेश देणाऱ्या “आशेची रोषणाई’ या लघुपटाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव झाला. या लघुपटाला “बेस्ट इस्तंबुल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये “बेस्ट शॉर्टफिल्म ज्यूरी स्पेशल ऍवार्ड’ या पुरस्काराने सन्मानित केले.
युवा उद्योजक आणि निर्माते पुनीत बालन यांच्या पुनीत बालन स्टुडिओजने “आशेची रोषणाई’ या लघुपटाची निर्मिती केली होती. याद्वारे निर्माते बालन यांनी “करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यांच्या आयुष्यात आनंद पसरवूया’ असा संदेश देणारी संकल्पना मांडली. यासाठी सिनेमॅटोग्राफी आणि दिग्दर्शन महेश लिमये यांचे असून संगीतकार अजय-अतुल यांचे पार्श्वसंगीत आहे. तर, अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी चारचॉंद लावले आहेत.
या लघुपटाला यापूर्वी “7 व्या गोवा शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’मध्ये “बेस्ट डॉक्युमेंट्री’ या पुरस्काराने सन्मानित केले. तर, इंग्लंडच्या “बेस्ट फिल्म ऍवार्ड’ फेस्टिव्हलमध्ये “बेस्ट डायरेक्टर ऍवार्ड’ “सेमी फायनलिस्ट’ आणि अमेरिकेच्या लॉस एंजलीस येथील
“इंडिपेंडंट शॉर्टस ऍवार्ड’साठी निवड झाली आहे.
“पुनरागमनाय च’ला “बेस्ट फिल्म ऍवार्ड’
पुनीत बालन स्टुडिओजची निर्मिती असलेल्या “पुनरागमनाय च’ या लघुपटालादेखील इंग्लंडच्या “बेस्ट फिल्म ऍवार्ड’ फेस्टिव्हलमध्ये “बेस्ट डायरेक्टर ऍवार्ड’ सेमी फायनालिस्ट आणि अमेरिकेच्या लॉस एंजलीस येथील “इंडिपेंडंट शॉर्टस ऍवार्ड’साठी निवड झाली आहे. यापूर्वी “पुनरागमनाय च’साठी “7 व्या गोवा शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’मध्ये लिमये यांना “सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्काराने सन्मानित केले होते.