शहाजापूर डोंगरावर फिरणाऱ्यांवर कारवाई करा ः शिंदे महाराज

सुपा -लॉकडाऊनमुळे घरात बंद असलेले पारनेर तालुक्‍यातील सुपा परिसरातील नागरिक शहाजापूर येथील डोंगरावर गर्दी करु लागले आहेत. त्यामुळे येथील गोशाळा चालकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे या फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नितीन महाराज शिंदे यांनी सुपा पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, करोना संसर्गामुळे गेल्या 50 दिवसांपासून सुपा परिसरातील नागरिक घरात बंद आहेत. त्यामुळे घरात बसून कंटाळलेल्या नागरिकांनी आता हळूहळू चोरून आपला मोर्चा शहाजापूरच्या डोंगरावर वळवला आहे. शहाजापूरची डोंगर रांग रमणीय आहे. मागील काही दिवसांत थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने निसर्ग बहरला आहे. तसेच सुंदर असे स्वयंभू कौडेश्वर महादेव मंदिर आहे. याच परिसरात गोशाळा आहे. येथे जाण्यासाठी पक्के रस्ते असल्याने पर्यटकांच्या गाड्या सुसाट सुटत आहेत.

शहाजापूरचे निसर्ग सौंदर्य भुरळ घालणारे आहे. त्यामुळे दररोज शेकडो पर्यटक येथे येत आहेत. त्यामुळे येथील माऊली कृपा गोशाळा चालकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून पारनेर तालुक्‍यासह नगर तालुक्‍यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. ते येताना खाद्यपदार्थ घेऊन येत आहेत. तसेच जाताना हा कचरा येथेच टाकून जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. गोशाळेतही 400 ते 500 गावरान गायी आहेत. त्या सर्व गायी या डोंगरावर चरण्यासाठी जातात. पर्यटकांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे काही गायींनी जीवही गमावला आहे. त्यामुळे या पर्यटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिंदे महाराज यांनी निवेदनात केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.