जिल्हा 1 जून रोजी करोनामुक्त होईल

नगर -जिल्ह्यात करोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत खबरदारी घेतली, तर आपण या संकटावर निश्‍चितपणे मात करू. आगामी काळात करोनाबाधित रुग्ण सापडले नाहीत, तर जिल्हा 1 जून रोजी करोनामुक्त होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांचा, तसेच इतर योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत मायकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींची यावेळी उपस्थिती होती.
प्रथम जिल्ह्यातील नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी कौतुक केले.

ते म्हणाले,  सध्या आपल्याकडे करोनाबाधित 68 रुग्ण आहेत. त्यापैकी 49 जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आगामी काळात करोना रुग्ण सापडले नाही, तर आपण 1 जून रोजी करोनामुक्त होऊ. त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. जिल्ह्यात 12 मार्च 2020 रोजी पहिला रुग्ण सापडला होता. मे महिन्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिक बाधित आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील मोठ्या धरणांत सध्या 36 टक्‍क्‍यांहून अधिक पाणीसाठा असून, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 24 टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या 21 शासकीय आणि 61 खाजगी टॅंकरद्वारे 72 गावे आणि 291 वाड्यांना पाणीपुरवठा होत आहे. टॅंकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच केशरी कार्डधारकांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियतनाप्रमाणे धान्य वाटप करण्यात आले आहे. मे महिन्यातील टक्के धान्याचे वाटप पूर्ण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन, अशा विशेष सहायक योजनांतील एक लाख 62 हजार 148 लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.