मुंबई – रविवारच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांमध्ये अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्याने राजकीय वातावरण चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह युवासेनेचे संघर्ष सुरु होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी शिंदे गटाने पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं.
खासदारांवर लावलेले आरोप चुकीचे आहेत अशा लोकांना जेल झाली पाहिजे अशी मागणी यावेळी सत्ताधारी आमदार पायऱ्यांवर करताना दिसले. राहुल शेवाळे यांनी ज्या महिलेविरोधात तक्रार दिली त्या महिलेला फूस लावली असल्याचा आरोप यावेळी सत्ताधाऱ्यांनी केला.तसेच यासाठी युवासेनेच्या नेत्यावर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी भाजपसह शिंदे गटाच्या आमदारांनी केली. दाऊदच्या संबंधित महिलेला पाठीशी घालणाऱ्या युवासेनेच्या नेत्यावर कारवाई करा अशा आशयाचे फलक यावेळी सत्ताधारी आमदारांनी हातात घेतल्याचे पाहायला मिळाले.
विरोधकांचे देखील पायऱ्यांवर आंदोलन
दुसरीकडे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी देखील सरकार विरोधात जोरदार घोणबाजी केली. सीमावादावरून माविकस आघाडीने यावेळी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायला सुरुवात केली. कर्नाटक सरकार हाय.. हाय च्या घोषणा देखील यावेळी विरोधकांनी दिल्या.