हरियाणा निवडणुकीच्या निकालाकडेही नजरा

चंडीगढ -महाराष्ट्राबरोबरच हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकालही उद्या (गुरूवार) जाहीर होणार आहे. त्या निकालाकडेही सगळ्यांच्या नजरा असतील.

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी हरियाणात 68 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. मतदारांनी कुणाला कौल दिला ते मतमोजणीमुळे स्पष्ट होईल. हरियाणात सत्ता असणारा भाजप ती राखेल, असे भाकीत बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्‍झिट पोल्स) केले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

मात्र, विरोधकांनी चाचण्यांचे भाकीत अमान्य केले आहे. सत्ताबदलाचा विश्‍वास कॉंग्रेस पक्षाकडून बोलून दाखवला जात आहे. यावेळी हरियाणातील राजकारणात जननायक जनता पक्ष (जेजेपी) या नव्या पक्षाचा उदय झाला. मागील वर्षी भारतीय राष्ट्रीय लोक दलात (आयएनएलडी) फूट पडल्याने जेजेपीची स्थापना झाली. तो नवा पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज एका चाचणीने व्यक्त केला आहे.

अर्थात, नेमके काय घडणार ते निकालामुळेच स्पष्ट होईल. हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यातील 47 जागा जिंकत मागील वेळी भाजपने सत्ता काबीज केली होती. तेथील निवडणुकीत एकूण 1 हजार 169 उमेदवार नशीब आजमावत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.