अफगाणिस्तानबाबतच्या शांतता चर्चेत पाकिस्तानचा सहभाग

इस्लामाबाद – पुढील महिन्यात मॉस्को इथे होणाऱ्या अफगाणिस्तानबाबतच्या शांतता चर्चेमध्ये पाकिस्तानही सहभागी होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या शांतता चर्चेच्या माध्यमातून खंडीत झालेली चर्चेची प्रक्रिय पुन्हा सुरू केली जाणार आहे. रशिया, अमेरिका, चीन आणि पाकिस्तान हे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत.

“पाकिस्तान चर्चेला भाग घेईल आणि अफगाणिस्तान, पश्‍चिम आशियाचे अतिरिक्त सचिव त्याचे प्रतिनिधित्व करतील.’असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी साप्ताहिक वार्तालापादरम्यान सांगितले.

जुलैमध्ये बीजिंगमध्ये झालेल्या चर्चेच्या मागील फेरीमध्येही इस्लामाबाद सहभागी झाला होता. अफगाणिस्तानात शांतता व सलोख्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांमध्ये पाकिस्तानचाही वाटा आहे, असेही फैजल यांनी सांगितले.

या महिन्याच्या सुरुवातीला अफगाण तालिबानच्या उच्च-स्तराच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानला भेट दिली. ही भेट अमेरिकेचे सलोखा दूत झल्माय खलीलझाद यांच्या इस्लामाबाद दौऱ्यासमवेत झाली होती. तालिबानने काबूलमध्ये झालेल्या हल्ल्‌याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान आणि अफगाणचे अध्यक्ष अशरफ गनी यांच्याशी वॉशिंग्टनजवळील कॅम्प डेव्हिड येथील गुप्त बैठक रद्द केली होती.

कतारची राजधानी दोहा येथे झालेल्या अमेरिका आणि तालिबान प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्यानंतर अमेरिका-तालिबानची चर्चा संपुष्टात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.