India Open 2024 – इंडिया ओपन बॅडमिटन स्पर्धेत तैपेयीच्या अनुभवी ताई झु यिंग हीने रविवारी महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तिने अंतिम सामन्यात चीनच्या चेन यु फेई हीचा २१-१६, २१-१२ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या ताईचे हे इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे पहिलेच विजेतेपद ठरले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये याच दोघींमध्ये झालेल्या अंतिम सामन्याची ही पुनरावृत्ती ठरली. तेव्हाही ताईनेच विजेतेपदासह सुवर्णपदक पटकावले होते.
या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत थायलंडच्या देकापोल पौवरंकुश व सॅपसिरे तीअरेतानाची या जोडीने विजेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम फेरीत चीनच्या जियांग झेन बांग व वेई या झीन या जोडीचा २१-१६, २१-१६ असा पराभव केला.
दुसरीकडे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीला BWF 750 इंडियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत विश्वविजेत्या कोरियन जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. सात्विक-चिराग जोडीला 65 मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात 21-15, 11-21, 18-21 असा पराभव स्विकारावा लागला. यासह कांग मिन ह्युक आणि सियो सेयुंग जेइ यांनी भारतीय जोडीविरुद्धची तीन पराभवांची मालिका संपुष्टात आणली.