सासवड -संत सोपानकाका महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून मंगळवारी (दि. 30) दुपारी 2 वाजता टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषत आणि 20 भाविकांसह संत सोपानकाका महाराजांच्या चलपादुका श्रीक्षेत्र पंढरपूरकडे एसटी बसने रवाना झाल्या. या पाठोपाठ येथील संत चांगावटेश्वर महाराजांच्याही पादुकांचे 10 भाविकांसह उत्साही वातावरणात पंढरीकडे प्रस्थान झाले.
देऊळवाड्यात मंगळवारी सकाळी दैनंदिन विधी होऊन दुपारी 2 वा प्रस्थानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रस्थानाचे अभंग, आरती होऊन एक मंदिर प्रदक्षिणा होऊन संत सोपनकाकांच्या पादुका देऊळवाड्यातून बाहेर पडल्या. ट्रस्टचे अध्यक्ष गोपाळ गोसावी यांनी पादुका पादुका एसटी बसमध्ये ठेवल्या. संत सोपानकाका सहकारी बॅंकेच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट केलेल्या एसटी बसमधून हा सोहळा पंढरपूकडे मार्गस्थ झाला.
प्रस्थानसमयी आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, नायब तहसीलदार उत्तम बढे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, एसटी आगार प्रमुख मनीषा इनामके, संत सोपानदेव ट्रस्टचे अध्यक्ष हभप गोपाळ गोसावी, सोहळाप्रमुख श्रीकांत गोसावी, पोलीस ठाण्याचे आणि महसूलचे कर्मचारी उपस्थित होते.