अबुधाबी – सलामीवीर डॅरेल मिशेलने केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील रोहमहर्षक लढतीत इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 19 व्या षटकात 5 गडी गमावून विजय मिळवला. न्यूझीलंडच्या भरात असलेल्या मार्टीन गुप्टीलने साफ निराशा केली. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन पुन्हा एकदा महत्त्वाच्या सामन्यात अपयशी ठरला. 2 बाद 13 अशा बिकट स्थितीतून डॅरेल मिशेल व डेव्हन कॉनवे यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 82 धावांची बहुमोल भागीदारी केली. कॉनवे अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच बाद झाला. त्याने 46 धावांच्या खेळीत 38 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावला. मिशेलने जेम्स निशामच्या साथीत 40 धावांची वेगवान भागीदारी केली.
दरम्यान, मिशेलने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. निशाम धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 27 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या 27 धावांच्या खेळीत 11 चेंडूत 1 चौकार 3 षटकार अशी फटकेबाजी केली. तो बाद झाल्यावर मिशेलने मिचेल सॅंटनरच्या साथीत संघाचा विजय साकार केला. मिशेलने 47 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद नाबाद 72 धावांची खेळी केली. सॅंटनर 1 धाव काढून नाबाद राहिला.
तत्पूर्वी, मोईन अलीचे अर्धशतक व डेव्हीड मलानची उपयुक्त खेळी यांच्या जोरावर इंग्लंडने 4 गडी गमावून 166 धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने जोस बटलरसह डावाची सुरुवात केली. बेअरस्टो आक्रमक फलंदाजी करत होता. या जोडीने 37 धावांची सलामी दिली. बेअरस्टो 13 धावांवर बाद झाला. बटलरने 29 धावांची खेळी करताना डेव्हीड मलानसह संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
बटलर परतल्यावर मोईन अलीने मलानसह तिसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागीदारी केली व संघाचे शतक फलकावर लावले. मलान 30 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 41 धावा करून परतला.
लिव्हिंगस्टोन 17 धावांवर बाद झाला. दरम्यान, मोईन अलीने आपले अर्धशतक साकार केले. त्याने कर्णधार इयान मॉर्गनच्या साथीत संघाला 20 षटकांत 4 बाद 166 धावा अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. मोईनने आपल्या नाबाद 51 धावांच्या खेळीत 37 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावले. कर्णधार मॉर्गन 4 धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड – 20 षटकांत 4 बाद 166 धावा. (डेव्हीड मलान 41, जोस बटलर 29, लियाम लिव्हिंगस्टोन 17, जॉनी बेअरस्टो 13, मोईन अली नाबाद 51, इयान मॉर्गन नाबाद 4, जेम्स निशाम 1-18, टीम साउदी 1-24, ऍडम मिल्ने 1-31, इश सोधी 1-32). न्यूझीलंड – 19 षटकांत 5 बाद 167 धावा. (डेव्हन कॉनवे 46, जोम्स निशाम 27, डॅरेल मिशेल नाबाद 72, मिचेल सॅंटनर नाबाद 1, लियाम लिव्हिंगस्टोन 2-22, ख्रिस वोक्स 2-36, आदील रशीद 1-39).