कणकवली – जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीला नितेश राणे यांच्याशिवाय सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याची सूचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.
या हल्ल्यामागे नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा हात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले होते. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. त्याने 2017 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक भाजपकडून लढविली होती. तर संतोष परब यांनीही आपल्या जबाबात आपल्यावर नितेश राणे यांच्या सांगण्यावरूनच हल्ला झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांच्यातर्फे अॅडव्होकेट संग्राम देसाई युक्तिवाद केला. तर ऍडव्होकेट राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर आणि उमेश सावंत हे वकील त्यांच्या सहकार्यासाठी उपलब्ध असतील. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट प्रदीप घरत आणि अॅडव्होकेट भूषण साळवी युक्तिवाद करतील.
राणे यांचा कानमंत्र
नारायण राणे यांनी कणकवलीत बैठक घेत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना या प्रकरणात नाहक गोवले जात असल्याचे म्हटले. तरीदेखील कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांच्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार राहावे. कोणत्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत विजय मिळवायचाच आहे. त्यासाठी परिश्रम घ्या. पुढील दोन दिवस महत्त्वाचे असून सावध राहा, असे नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.