लॉकडाऊनचा फटका; मुख्यसभा न झाल्याने झाली अडचण
पुणे – महापालिकेतील 162 मधील 98 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. लॉकडाऊनमुळे सलग दोन महिन्यांच्या मुख्यसभा मर्यादित उपस्थितीत तहकूब केल्या आहेत. त्यामुळे ज्या नगरसेवकांनी या सभांच्या वेळेआधी किंवा थोड्यावेळानंतर सभांच्या उपस्थिती रजिस्टरमध्ये सह्या केल्या आहेत, त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या दोन्ही सभांच्या उपस्थिती रजिस्टरमध्ये सह्या नसलेल्या सुमारे 98 नगरसेवकांना जून महिन्याची मुख्यसभाही न झाल्यास सलग तीन सभांना अनुपस्थित राहिल्याने आपले नगरसेवकपद गमवावे लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 11 मध्ये नगरसेवकांच्या अपात्रतेचे निकष दिले आहेत. त्यातील एका निकषानुसार, महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेला सभासद सलग तीन महिने मुख्यसभांना अनुपस्थित राहिल्यास त्यांचे नगरसेवकपद रद्द होते. मात्र, सभांना उपस्थित राहाता येत नसल्यास संबंधित नगरसेवकांनी रजेचा अर्ज केल्यास आणि ती मंजूर झाल्यास अपात्र होत नाही. या निकषानुसार, महापालिकेची मार्च महिन्याची मुख्यसभा झालेली आहे. या महिन्यात जवळपास सर्वच सदस्य सभांना उपस्थित होते. मात्र, त्यानंतर देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाल्याने पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असल्याने काही मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत सभा पार पडल्या.
तर, काही सदस्यांना सभागृहात तात्पुरती हजेरी लावून रजिस्टरमध्ये सह्या केल्या, अशा नगरसेवकांची संख्या सुमारे 59 आहे. तर, पाच सदस्यांनी रजेसाठी अर्ज दिले होते. ते मंजूर करण्यात आलेले आहेत. तर, तब्बल 98 नगरसेवक एप्रिल आणि मे महिन्यात मुख्यसभांना अनुपस्थितीत असून लॉकडाऊनमुळे जून महिन्याची मुख्यसभा पुढे ढकलल्यास अथवा या सभासदांना बैठकीस येता न आल्यास त्यांचे नगरसेवकपद जाण्याची शक्यता आहे.
अखेर मुख्यसभा घ्यावीच लागणार
लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविल्याने मुख्यसभा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महापौरांनीच आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे जून महिन्याची सभाही ठरावीक सभासदांच्या उपस्थितीत होईल, अशी शक्यता होती. मात्र, आता तीन महिन्यांच्या नियमात सुमारे 98 नगरसेवक अपात्र होण्याची भीती असल्याने महापालिका पदाधिकाऱ्यांना सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीसाठी जून महिन्याची मुख्यसभा घ्यावी लागणार आहे. त्यासाठी नियोजनही सुरू असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच दिली आहे.