- दुसऱ्या संघातून खेळू नये यासाठी भाच्यानेच केले जखमी
पिंपरी- ‘तू ब्रह्मा-विष्णू-महेश संघामधून कबड्डी खेळू नको, तू आमच्या ओम साई कबड्डी संघामधून कबड्डी खेळ ‘, असे म्हणत भाच्याने मामाच्या मांडीवर तलवारीने वार केले. तसेच पायाच्या नडगीवर दगडाने मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी भाच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 3) सकाळी चिखली गाव येथे घडली.
संतोष बाळासाहेब मोरे (वय 34, रा. चिखली गाव) असे जखमी मामाचे नाव आहे. त्यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भाचा राहुल यादव, सोन्या नेवाळे, गौरव गावडे (सर्व रा. चिखली) आणि दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संतोष मोरे गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्या वेळी त्यांचा भाचा आरोपी राहुल तिथे आला. ‘तू ब्रम्हा विष्णू महेश संघामधून कबड्डी खेळू नको, तू आमच्या ओमसाई कबड्डी संघामधून खेळ. नाहीतर मी तुला कबड्डी खेळण्याच्या लायक सोडणार नाही’ अशी धमकी देत राहुल यादव याने फिर्यादी यांच्या मांडीवर तलवारीने वार केले. तसेच दगडाने डाव्या पायाच्या नडगीवर मारून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.