अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या
बारामती – राजकीय वैर असलेले दोन प्रमुख नेते जेव्हा शेजारी-शेजारी बसतात तेव्हा चर्चा तर होणारच हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. निमित्त होते ते मांजरी येथील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्युटची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे. या सभेत चक्क अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे खुर्चीला खुर्ची लावून गप्पांमध्ये रंगलेले पाहायला मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे दोघांमध्ये बराच वेळ चर्चाही झाली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात असले, तरी राजकीय मतभेदानंतर दोघे एकत्र दिसल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात स्थानिक राजकारणावरून मतभेद आहेत.
दरम्यान, विधानसभा जागावाटपावरून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संबंध चिघळले होते. त्यातच कॉंग्रेसचा “हात’ सोडून भाजपचे “कमळ’ पाटलांनी जेव्हा हाती धरल होते त्यावेळी पक्ष सोडण्याचे सगळे खापर राष्ट्रवादीवर फोडत राष्ट्रवादीमुळे आपण कॉंग्रेस सोडत असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्याचबरोबर अजित पवारांचे माझ्यावर खूप प्रेम आहे, असा टोलाही पाटलांनी त्यावेळी लगावला होता.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात जोरदार आघाडीच उघडली होती. इंदापूर मतदारसंघातील प्रचारसभेत अजित पवारांनी आमदार होऊ देणार नाही, असे आव्हानच दिले होते. मात्र, आता राजकीय मैदानात आमनेसामने आलेल्या अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील आजच्या भेटीने अनेकांना धक्का बसला असून या गप्पांमागे नेमके काय गणित खेळले गेले हे येणारा काळच सांगेल.
व्यासपीठावर पवारांनी बदलल्या नावाच्या पाट्या व्यासपीठावर नावाच्या पाट्या बघून नेते बसत असतानाच अजित पवार पुढे आले आणि त्यांनी नावाच्या पाट्या बघितल्या. त्यात हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये कल्लापअण्णा आवाडे यांच्या नावाची पाटी होती. ती पाटी अजित पवार यांनी बदलून हर्षवर्धन पाटील यांची पाटी शेजारी घेतली आणि
नंतर मागोमाग आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना शेजारी बसवून घेतले. त्यामुळे अजित पवार यांनी केलेल्या खुर्ची बदलामुळे राजकीय चर्चांना उधाण आले.
या ना त्या कारणाने अजित पवार कायमच चर्चेत
शरद पवार यांना ईडीची आलेली नोटीस आल्यावर ते थेट ईडीच्या कार्यालयात जाणार होते त्याच दिवशी अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली होती. तर शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात सत्तास्थापन करत असतानाच अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसने “हातमिळवणी’ केली असल्याचे सांगून राज्यात बॉम्बच टाकला होता.
तर या दोघांचे चार दिवसांचे सरकार कोसळल्यानंतर अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एका लग्नसमारंभात शेजारी बसलेला व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून बरीच राजकीय चर्चा रंगली होती. मात्र, आम्ही हवा पाण्याच्या गप्पा मारल्या, असा खुलासा अजित पवार यांनी स्पष्ट केले होते, त्यामुळे अजित पवार आणि चर्चा आता जणू समीकरणच बनले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सहकार क्षेत्रासाठी सारे काही?
सध्या महाविकास आघाडीची सत्ता असून यात सहकार क्षेत्राच्या चाव्या या अजित पवार यांच्या ताब्यात येण्याची शक्यता असल्याने हे खाते मजबूत करण्यासाठी सहकार खात्यातील खाचखळगे जाणून असलेला व्यक्ती जवळ असावा व सहकारक्षेत्रावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा दबदबा कायम ठेवण्यासाठी अजित पवार यांनी या कार्यक्रमानिमित नामी संधी चालून आली होती आणि ती अजित पवार यांनी हेरली. हर्षवर्धन पाटील हे माजी सहकारमंत्री असल्याने त्यांना सहकारामधील खडान् खडा माहिती असल्याने असल्याने हे खाते सांभाळताना त्यांची निश्चित मदत होणार हे पवार जाणून असल्याने पाटलांशी आपण सुत जुळवल्याचे जणू सूतोवाच त्यांनी या कार्यक्रमातून दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.