नाशिक – दोन दिवसांपूर्वी नाशिक सहकार विभागाचे उपनिबंधक सतीश खरे यांना 30 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली होती. त्याच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सतीश खरे 19 मेपर्यंत एसीबीच्या कोठडीत असून त्याने मोठे घबाड गोळा केल्याचा संशय आहे. दरम्यान शुक्रवारी खरेच्या इतर बॅंक खात्यांसह लॉकर्सची झाडाझडती घेण्यात येणार असून आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.
भ्रष्टाचारात नाशिक विभाग सध्या पहिल्या क्रमांकावर आला असून गेल्या 117 दिवसात तब्बल 66 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. दोनच दिवसांपूर्वी 30 लाखांची लाच स्वीकारताना सहकार विभागाचे उपनिबंधक सतीश खरे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सतीश खरे हा 19 मेपर्यंत एसीबीच्या कोठडीत असून त्यांनी मोठं घबाड गोळा केल्याचा संशय आहे.
खरेसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे विविध बॅंकेत 13 खाती आहेत. त्यापैकी काल 8 खाती उघडण्यात आली असता त्यात 43 लाख 76 हजार रुपये आढळून आले आहेत. आज त्यांच्या इतर बॅंक खात्यांसह लॉकर्सची झाडाझडती घेण्यात येणार असून आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.
तब्बल 30 लाखांची लाच घेत सहकार खात्याची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या नाशिक जिल्हा उप निबंधक सतीश खरे यांचे “खोटे’ कारनामे आता उजेडात येऊ लागले आहे. ज्या ठिकाणी खरे यांनी नोकरी केली त्या ठिकाणी सहकारी संस्था अडचणीत आणत भ्रष्टाचार करून कोट्यवधीची माया जमवली असल्याचा आरोप करत येवला मर्चंट्स बॅंकेचे संचालक व भाजपचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी यांनी थेट पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
जिल्ह्यातील काही आमदार व राजकीय नेते यांच्या संगनमताने जमिनी व प्लॉट खरेदी केल्याचाही त्यांनी संशय व्यक्त करतांना या सर्व प्रकाराची इडी, सीबीआय या संस्थेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तशा आशयाची तक्रार ई मेलद्वारे देशाचे पंतप्रधान व सहकार मंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.