अलिगड – हिंदू पुराणकथांमधील बलात्काराच्या उदारणांबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल अलिगड मुस्लिम विद्यापीठातील एका प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. डॉ. जितेंद्र कुमार या प्राध्यापकाने फॉरेन्सिक सायन्सच्या अभ्यासक्रमादरम्यान हे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप झाला होता.
डॉ. जितेंद्र कुमार हे अलिगड मुस्लिम विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमधील सहायक प्राध्यापक आहेत. वैद्यकीय न्यायशास्त्राच्या वर्गात त्यांनी हिंदू पुराणकथांमधील बलात्काराच्या उदाहरणांचा उल्लेख केला होता. याची दखल घेऊन शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावण्यात आली होती आणि आपल्या वक्तव्याचे स्पष्टिकरण 24 तासांच्या आत देण्याचे आदेश देण्यात आले होते.
प्रा. जितेंद्र कुमार यांच्या वक्तव्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने दोन सदस्यीय समितीही नियुक्त केली होती. मात्र त्या चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच कुमार यांना निलंबित करण्यात आले. कुमार यांच्याविरोधात गैरवर्तवणूकीचा सकृतदर्शनी पुरावा उपलब्ध असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या स्लाईड शो दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये कुमार यांचे हे वक्तव्य स्पष्ट ऐकू येते आहे.
आपला हेतू कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. मात्र बलात्कार आपल्या समाजामध्ये फार पूर्वीपासून होत आले आहेत, हे सांगण्याच्या ओघात हे वक्तव्य करण्यात आले होते, असे स्पष्टिकरण कुमार यांनी कुलगुरू मन्सूर यांना लिहिलेल्या पत्रात दिले आहे. ही एक अनवधानाने झालेली चूक होती. यापुढे अशी चूक होणार नाही, अशी हमीही कुमार यांनी दिली आहे.