Sushma Andhare : राज्यात सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राज्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाला आता सर्व राज्यातून पाठिंबा वाढत आहे. त्यातच राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया येत असून सरकारला धारेवर धरले आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिकांवरूनही जोरदार हल्ला केला. त्यासाठी त्यांनी “देवेंद्र फडणवीस त्यांचा आणि गुणरत्न सदावर्तेंचा संबंध नाही म्हणतात, पण सदावर्ते ‘आय लव्ह यू फडणवीसजी’”, असे म्हणत असल्याची टीका केली.
पुढे बोलताना सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीका करताना,“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या राज्यात एकही जमावाकडून हत्या करण्याची घटना घडली नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात एकही जातीय-धार्मिक दंगल घडली नाही. सध्या ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्यात विचार करा की, एकीकडे देवेंद्र फडणवीस होय आम्ही आरक्षण देणार आहोत असं म्हणतात.”असे म्हटले आहे.
त्यासोबतच “दुसरीकडे फडणवीसांचाच चेला असलेले गुणरत्न सदावर्ते म्हणतात की, श्रद्धेय देवेंद्र फडणवीसांना काय ते माहिती आहे, मी आरक्षण मिळू देणार नाही. फडणवीस सांगतात की, त्यांचं आणि सदावर्तेंचा काही संबंध नाही आणि सदावर्ते श्रद्धेय फडणवीस म्हणतात. फडणवीस आमचं श्रद्धास्थान आहे, ‘आय लव्ह यू फडणवीसजी’, असं सदावर्ते म्हणत आहेत,” असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
“म्हणजे एकूण सगळा खेळ जर बघितला तर आपल्या लक्षात येतंय की, इसने उसे दिल दिया दिलदार समझकर, उसने इसे ठुकरा दिया फुटबॉल समझकर. असा यांचा सगळा खेळ चालू आहे,” असा टोलाही सुषमा अंधारे यांनी फडणवीस-सदावर्तेंना लगावला आहे.