MLA Disqualification Case: : विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर (Adv. Rahul Narvekar) यांना आमदार अपात्रतेबाबत दिरंगाई केली जात असल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुनावले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सॉलिस्टर जनरल यांनी दसऱ्याच्या सुट्टी दरम्यान विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करावी आणि सुधारीत वेळापत्रक द्यावं, असं स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर आज राहुल नार्वेकर सुधारित वेळापत्रक सादर करणार का? हे पाहावे लागणार आहे.
याप्रकरणी सुनावणीच्या एक दिवसआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी रविवारी (29 ऑक्टोबर) दिल्लीत जाऊन सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भेट घेतली. आमदार अपात्रताप्रकरणी कायदेशीर सल्ला घेणार असल्याचेराहुल नार्वेकर यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सांगितले होते. आजच्या सुनावणीवेळी सुधारित वेळापत्रकाबाबत मेहता विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांमधील आमदारांबाबत एकत्रित सुनावणी होणार आहे.
गेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केवळ शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 34 याचिका दाखल झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सरन्यायाधीशांनी तुम्ही निर्णय घेत नसाल, तर त्यासंदर्भातला निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, तुम्ही जर यामध्ये ठोस वेळापत्रक देत नसाल आणि यासंदर्भातील याचिका निकाली काढत नसाल, तर आम्हाला नाईलाजाने यामध्ये दखल द्यावी लागेल, असं म्हणत सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांना गेल्या सुनावणीत सांगितले होते.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणी नवं वेळापत्रक सादर करणार आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणी सादर केलेले नवे वेळापत्रक सर्वोच्च न्यायालय मान्य करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.