मुबंई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटणा पोलीस मुंबईत दाखल झाले आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर पाटणा पोलीस सुशांतच्या कंपनीचे बॅंक खाते असलेल्या वांद्रे येथील कोटक महिंद्रा बॅंकेतील खात्यांची तपासणी करत आहेत.
युरोपला गेल्यानंतर रियाने सुशांतच्या बॅंक खात्यातून कोट्यवधी रुपये काढले, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर पाटणा पोलीस तपास करत आहेत. पाटणा पोलिसांनी कोटक महिंद्रा बॅंकेत सुशांतच्या कंपनीच्या बॅंक खात्याबाबत चौकशी केली. यावेळी मुंबई पोलिसांनी चांगलं सहकार्य केल्याची माहिती पाटणा पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सुशांतच्या रियालिटीएक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे खाते वांद्रे येथील कोटक महिंद्रा बॅंकेत आहे. बिहार पोलिसांनी बॅंक मॅनेजरकडून 2018 ते 2020 दरम्यानच्या सर्व व्यवहारांची माहिती घेतली. पोलिसांनी जवळपास 2 तास बॅंकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच रिया चक्रवर्तीवर पाटणा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल असल्याने तो मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करत रियाने चौकशीला स्थगिती मिळविली होती. यानंतर गुरुवारी सुशांतसिंहच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले आहे.