नाशिक: सिन्नर नगरपरिषदेत पारनेरची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र असून पुन्हा एकदा राष्ट्रवादीने मित्रपक्ष शिवसेनेला धक्का दिला आहे. नाशिकमधील सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच नगरसेवक फुटले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना बंडखोरालाच निवडून आणले.
पारनेरमधील राजकारणावरून उडालेला धुरळा शांत होत नाही, तोच सिन्नर नगरपरिषदेत याची पुनरावृत्ती घडली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे यांच्या गटाने शिवसेनेचे 5 नगरसेवक फोडले.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रणाली गोळेसर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या बाळासाहेब उगले यांनी बंडखोरी करत त्यांच्याविरोधात अर्ज भरला.
बाळासाहेब उगले यांनी बुधवारी झालेल्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे गटाच्या सहाय्याने पंधरा मते मिळवली. तर प्रणाली गोळेसर यांना 14 मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी पक्षाविरोधात मतदान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.