नगर, (प्रतिनिधी) – मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी नगर जिल्ह्यात गावनिहाय सर्वेक्षणाचे काम २ फेबु्रवारीला पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १४ तालुके, भिंगार छावणी मंडळ आणि नगर मनपा हद्दीत हे सर्वेक्षण झाले असून सर्वेक्षणादरम्यान ८ लाख ९९ हजार १२४ कुटूंबाची सामाजिक, कौटूंबिक, आर्थिक, आरोग्य विषय माहिती मागास आयोगाच्या ऑनलाईन ऑपमध्ये फिड झाली आहे. तर सर्वेक्षणादरम्यान जिल्हा प्रशासनाला ८ हजार १८९ कुटूंब आढळली नसून ६४३ कुटूंबांनी सर्वेक्षणासाठी आवश्यक असणारी माहिती देण्यास नकार दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णय राज्य शासनाने घेतला. तत्पूर्वी राज्यातील मराठा समाजाचा मागासलेपणा सिध्द करण्यासाठी शासनाने राज्य मागास प्रवर्ग आयोगाची नियुक्ती केली.
या आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्ह्यातील ९ लाख कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी महसूलसह इतर सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांची मदत घेतली गेली.
पुण्याच्या गोखले इन्स्टिट्युटने तयार केलेल्या मोबाईल अॅपद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांचे २३ जानेवारीपासून सर्वेक्षण सुरु झाले होते. त्यानंतर २ फेबु्रवारीपर्यंत हे सवर्र्ेक्षण पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षण करणार्या शासकीय कर्मचार्यांनी सर्वेक्षणादरम्यान मिळालेली माहिती माहिती ऑनलाईन अॅपवर भरली असून अॅपमध्ये संकलित होणार्या माहितीच्या आधारे निष्कार्ष काढून गोखले इन्स्टिट्युट राज्य मागास आयोगाला कळवणार आहे.
त्यानंतर मराठा समाजाचे मागासलेपणासोबत आरक्षणाचा मुद्दा निकाली निघणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सर्वेक्षणात नगर जिल्ह्यात ९ लाख कुटूंब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची माहिती ऑनलाईनपणे संकलित करण्यात आली आहे.